भिवंडी : शहराअंतर्गत मुंबई-नाशिक महामार्गावर चेनस्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. त्यातच बुधवारी रात्री रिक्षातून ठाण्याकडे जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल फोन हिसकावून दोन दुचाकीस्वार फरार झाले. नारपोली पोलिसांनी अज्ञात दोन दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. नारपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील नौपाडा परिसरात राहणारा अभिजीत सतीश देसाई (३६) हा काही कामानिमित्त कल्याणला गेला होता. ११ जुलै रोजी काम संपवून तो रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रिक्षाने घराकडे निघाला होता. माणकोली उड्डाणपुलावरून जात असताना अभिजीत मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता. दरम्यान, त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन २५ वर्षीय तरुण रिक्षाच्या पाठीमागून आले आणि त्यांनी अभिजीतचा मोबाईल हिसकावून ठाण्याच्या दिशेने पलायन केले. रिक्षाचालकाने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला. या घटनेचा पुढील तपास पोऊनि रोहन शेलार करीत आहेत.