
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेनेने सर्वोच्च न्यायालयात केल्याने मनसेचे नेते आक्रमक झाले आहेत. मनसेची मान्यता राहावी की नाही, हे आता भैये ठरवणार का, आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी यासाठी जर भैये प्रयत्न करणार असतील, तर भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचे की नाही, याचा विचार आम्हालाही करावा लागेल, असा इशाराही मनसेच्या नेत्यांनी दिल्याने नजीकच्या भविष्यात मराठी आणि उत्तर भारतीय यांच्यातील वाद उफाळून येण्याची लक्षणे दिसत आहेत.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी केली. शुक्ला यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. तसेच कारवाईचीही मागणी केली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे.
मनसेची मान्यता राहणार की जाणार हे भैये ठरवणार का, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
मनसेकडून धमकी शुक्ला यांचा दावा
राज ठाकरे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारे सुनील शुक्ला यांनी मनसैनिकांवर आरोप केले आहेत. मनसैनिकांकडून आपल्याला धमकी देण्यात येत असल्याचा आरोप सुनील शुक्ला यांनी केला आहे. तसेच आपल्याला कितीही धमकी आली तरी आपण घाबरणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. शुक्ला यांनी पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. मला आतापर्यंत कोणतीही सुरक्षा मिळालेली नाही. मला कुठलेही संरक्षण मिळालेले नाही. महाराष्ट्र सरकारला कुठलेही संरक्षण द्यायचे नाही. त्यांना वाद पाहिजे असेही ते म्हणाले.