
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी पुढच्या महिन्यात होणाऱ्या आषाढी वारीवर बंधने घालण्यात येणार नाहीत; मात्र कोरोनाचे संकट विचारात घेऊन वारीच्या काळात काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे.
“राज्यातल्या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत; मात्र वारीसंबंधीचा विषय फार पुढे गेला असल्याने त्यावर निर्बंध घालणे योग्य होणार नाही. वारीत १० ते १५ लाख वारकरी सहभागी होतात. त्यामुळे यंदाची वारी होईल त्यात कोणतीही अडचण येणार नाही,” असे आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी चर्चा करण्यात आली. यावेळी कोविडबाबत सादरीकरण करण्यात आले.
राज्यात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व पुणे या सहा जिल्ह्यांत कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. या जिल्ह्यात तीन ते आठ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे. चाचण्यांमध्ये रुग्ण बाधित आढळत असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण चार टक्के आहे. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही; पण या सहा जिल्ह्यांत कोरोना चाचण्या कठोरपणे वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
वारीबद्दल माहिती देताना टोपे म्हणाले की, “वारीमध्ये लाखो वारकरी एकत्र येतात. त्यामुळे काळजी घेऊन वारी पूर्ण करावी लागेल, अशी चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. यंदाची वारी होईल त्यात कोणतीही अडचण येणार नाही.”
दरम्यान, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेले अनेक सेलिब्रिटी कोरोनाबाधित झाले आहेत. या पार्टीत सहभागी झालेल्यांना कोरोनाच्या बीए ४ व बीए ५ या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. राजकीय नेतेही कोरोनाबाधित होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही कोरोनाबाधित झाले आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही ताप येत आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही, अशी माहिती टोपे यांनी दिली.
मास्क सर्वांनी वापरावा
“मास्कचा वापर सक्तीचा केलेला नाही. दंडही आकारण्यात येणार नाही; मात्र सर्वांनी मास्क वापरावा,” असे आवाहन टोपे यांनी केले. “त्याचप्रमाणे लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी बूस्टर डोस घ्यावा. दुसरा डोस घेतल्यावर नऊ महिने झाले असतील तर त्यांनी बूस्टर डोस घ्यावा. स्वतःची व समाजाची काळजी घेण्यासाठी बूस्टर डोस घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.