
पावसाळा अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मान्सून आगमन झाल्यानंतर पावसाने मात्र दडी मारली आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, इमारत कोसळणे, पूरस्थिती निर्माण झाल्यावर अडकलेल्यांना रेस्क्यू करणे अशा विविध बचावकार्यात ‘टायगर’ची भूमिका महत्त्वाची असते. एखादी व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकली हे ‘टायगर’ वास घेत खुणावतो आणि त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढणे शक्य होते. भिवंडी येथे इमारती कोसळल्यानंतर टायगरमुळे अडकलेल्यांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित बाहेर काढणे शक्य झाले. एनडीआरएफच्या पथकाबरोबर ‘टायगर’ आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असतो.
यंदाच्या पावसाळ्यात ४१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असून कुर्ला पश्चिम, घाटकोपर, भांडुप, चेंबूर येथे डोंगराळ भाग अधिक असल्याने या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) असिस्टंट कंमाडर सारंग कुर्वे यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत एनडीआरएफच्या तीन टीम कायम असून यंदा दोन अतिरिक्त टीम घाटकोपर व कांजूरमार्ग येथे तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आग लागणे, झाड कोसळणे अशाप्रकारची कुठलीही दुर्घटना घडल्यावर मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करत अडकलेल्यांचा जीव वाचवतात. परंतु मोठा ब्रिगेड कॉल किंवा दरड कोसळली, इमारत कोसळली आणि त्यात अनेक लोक अडकली तर एनडीआरएफच्या टीमना घटनास्थळी पाचारण करण्यात येते. मुंबईत अंधेरी पश्चिम येथील अंधेरी स्पोर्ट्स क्लब येथे तीन टीम कायमस्वरूपी तैनात आहेत. फक्त यंदा दोन अतिरिक्त टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पालिकेने दिलेल्या यादीनुसार ४१ स्पॉट दरड कोसळण्याची असून या ठिकाणी एनडीआरएफचे जवान जाऊन रेकी करत आहेत. लँड स्लाईडची घटना घडल्यावर घटनास्थळी वेळेत कसे पोहोचायचे, रस्त्यात कुठली अडचण येऊ शकते, घटनेच्या ठिकाणी काय अडचण येणार, याचा अभ्यास करण्यासाठी रेकी केली जाते आणि त्यानंतर समस्येवर उपाययोजना केल्या जातात, असेही कुर्वे यांनी सांगितले.
जनजागृती मोहीम सुरू
ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका अधिक असतो अशा ठिकाणी एनडीआरएफची टीम जाऊन लोकांमध्ये जनजागृती मोहीम राबवते. ४१ ठिकाणे शोधण्यात आली असून या ठिकाणी टीमने आपत्कालीन परिस्थितीत आपण घरातील वस्तूंपासून कशाप्रकारे आपला बचाव करू शकतो, दरड कोसळल्यावर विशेष करून लहान मुलांना सीपीआर देणे या बाबत टीम प्रशिक्षण देत आहे. अंधेरी, कांजूर, भांडूप, कुर्ला कसाईवाडा या ठिकाणी जनजागृती मोहिम राबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले. एखाद्या ठिकाणी लँड स्लाईड झाली तर प्रथम तेथील स्थानिक लोकच घटनास्थळी मदतकार्य राबवतात. एखादी व्यक्ती किती प्रमाणात जखमी असून त्याला रुग्णालयात न त्रास होता घेऊन जाणे, याचे प्रशिक्षण स्थानिकांना देण्यात येत आहे, असेही सारंग कुर्वे यांनी सांगितले.
छोटा काश्मीर येथे बोटिंगचे प्रशिक्षण
पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण झाल्यावर बचावकार्य करण्यात कुठल्या अडचणी येऊ शकतात, कशाप्रकारे पाण्यात अडकलेल्यांना बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू करणे, याचे प्रशिक्षण टीमला देण्यात आलेले असते. तरीही सराव करण्यासाठी मुंबई महापालिकेने छोटा काश्मीर येथील तलावात प्रशिक्षणाची व्यवस्था केल्याने त्या ठिकाणी टीमचे बोटिंगचे प्रशिक्षण सुरू आहे.
‘हाय रिस्क’ची रेकी
ज्या भागात पाणी तुंबण्याचा, इमारत अथवा दरड कोसळण्याचा धोका आहे, अशा ठिकाणची म्हणजेच दादर, परळ, अंधेरी, सायन, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, कांजूर, भांडुप, दहिसर आदी भागातील धोकादायक ठिकाणांची रेकी करत असल्याचे ते म्हणाले.
व्हिकटीम लोकेटिंग कॅमेरा उपयुक्त
एखाद्या ठिकाणी घटना घडली आणि कोणी ढिगाऱ्याखाली दाबले, अडकले असल्याचा शोध घेण्यासाठी व्हिकटीम लोकेटिंग कॅमेरा याचा वापर केला जातो. हा कॅमेरा लहानशा होलातून आत टाकण्यात येतो आणि आत कोणी अडकले आहे का, हे दिसून येते आणि त्यांना सुखरूप बाहेर काढणे शक्य होते.
ग्रीन कॉरिडोअरची सुविधा
आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी वेळेत पोहोचता यावे, यासाठी एनडीआरएफच्या टीमसाठी स्वतंत्र मार्ग अर्थात ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध केला आहे. त्यामुळे टीमला घटनास्थळी पोहोचण्यात अडचण येत नाही, असेही सारंग कुर्वे म्हणाले.
‘टायगर’ची भूमिका महत्त्वाची
एखाद्या ठिकाणी इमारत अथवा दरड कोसळली तर त्याठिकाणी बचावकार्य करताना पावसाळ्यात अडचण येत असते. ढिगाऱ्याखाली कोण अडकले, याचा शोध घेण्यात अडचणी येत असल्या तरी एनडीआरएफच्या टीमचा सहकारी टायगर खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतो. टायगरमुळे अडकलेल्यांना रेस्क्यू करणे सोपे झाले आहे. त्यामुळे आमच्यासाठी ‘टायगर बेस्ट’ आहे.
एखाद्या ठिकाणी घटना घडल्यानंतर आपला जीव वाचवण्यासह दुसऱ्याचा जीव वाचवणे याला आम्ही प्राधान्य देतो. घटना घडते त्यावेळी स्थानिक लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. तरीही आम्ही समजूत काढत अडकलेल्यांना रेस्क्यू करणे याला प्राधान्य देतो. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर संबंधित यंत्रणांना सहकार्य करावे, जेणेकरून जीवितहानी टाळणे शक्य होईल.
- सारंग कुर्वे, असिस्टंट कंमाडर, एनडीआरएफ, (अंधेरी पश्चिम)