
मुंबई : २४ तास खुली असलेली कंव्हिनियन्स स्टोअर्स अर्थात ग्राहकांना सोयीची ठरणारी दुकाने यांच्यावर कायद्याद्वारे कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. किंबहुना अशा दुकानांमुळे ग्राहकांना सुविधा तर अर्थव्यवस्थेला मदतच होते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. त्याचबरोबर न्यायालयाने पुणे पोलिसांना रात्री ११ नंतर दुकाने बंद करण्याचा आदेश न देण्याचे निर्देश दिले.
२४x७ कंव्हिनियन्स स्टोअर्सची संकल्पना जगभर लोकप्रिय आहे, असे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि अद्वैत सेठना यांच्या खंडपिठाने म्हटले आहे. "ही दुकाने ग्राहकांसाठी, विशेषतः ज्यांच्या कामाचे तास असामान्य असतात त्यांच्यासाठी सोयीस्कर, सुलभ आणि वेळेबाबत सोयीची असतात. हा आदेश पुणे येथील हडपसर भागात 'द न्यू शॉप' चालवणाऱ्या ॲक्सेलरेट प्रॉडक्ट्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या याचिकेवर आला. "या फायद्यांचा विचार करत आणि जागतिक मानकांसह प्रगती साधण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र सरकारने अशा स्टोअर्ससाठी कोणतेही वेळेचे बंधन लादलेले नाही," असे न्यायालयाने म्हटले.
ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या खर्चामुळे आणि अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्यामुळे अर्थव्यवस्थेला वाढवण्यास ही सुविधा मदत करते. आपल्या मोठ्या देशासाठी, जिथे बेरोजगारी एक मोठा आव्हान आहे, तिथे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
याचिकेत दावा करण्यात आला होता की, स्थानिक पोलिस कंपनीला ११ वाजता दुकान बंद करण्यास बळजबरी करतात होते. परंतु कोणताही कायदा असे सांगत नाही की कंव्हिनियन्स स्टोअर रात्रीभर उघडे राहू शकत नाही.