नागपंचमीनिमित्त पूजा नाही, तर साप संवर्धनाची गरज!

वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे नागरिकांना अंधश्रध्दा आणि गैरसमज दूर करण्याचे आवाहन
नागपंचमीनिमित्त पूजा नाही, तर साप संवर्धनाची गरज!

श्रावण महिन्यातील पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाची ओळख आहे. यानंतरच सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण सोमवारनंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. या नागपंचमी सणादिवशी अनेक जण नाग अथवा सापाची पूजा करतात. मात्र आता फक्त या जीवांची पूजा करून चालणार नाही तर या जीवांना वाचविण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे. वनसंपदा असलेल्या आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यात सर्पमित्रांकडून साप संवर्धनाची मोहीम राबविण्याची गरज असल्याचे ठाणे, नवी मुंबईत कार्यरत असलेल्या वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेकडून सांगण्यात आले. यासोबतच सापांविषयी समाजात आजही अनेक अंधश्रध्दा आणि गैरसमज पसरलेले आहेत. ते दूर करण्याचे काम शहरात ठिकठिकाणी करून या मौल्यवान जीवाला वाचवणे हीच नागपंचमी निमित्त शपथ सर्व नागरिकांनी घेणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
नाग म्हटल्यावर कोणाचाही थरकाप उडतो. दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीत सापांचे अनन्यसाधारण महत्व आहे. नुकताच नागपंचमी सण संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने साप हा मित्र आहे. भारतात सापांच्या सुमारे २३६ जाती सापडतात. त्यात फक्त ५२ जाती विषारी आहेत. शेतात पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासह महत्वाची भूमिका निभावणाऱ्या या सापाला अनेकदा मारले जाते. तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात बिळे व जमिनीखालील जागा बुजल्या गेल्याने साप मानवी वस्तीकडे आकर्षित होतात. पावसाळ्याच्या काही दिवस अगोदर मानवी वस्तीतील सुरक्षित ठिकाणे, त्यात दगड-विटांचे ढिगारे, घरांच्या कपारीचा असरा घेतात. याच दिवसात पक्षी अंडी देतात. बेडूक, सरडे, पाली असे प्राणी देखील मुबलक प्रमाणात आढळतात. सापांचे हे खाद्य असल्याने ते देखील यावेळी बाहेर पडतात. परंतु शहरात भीतीमुळे सापांना मारले जाण्याचा दुर्घटना घडतात. मात्र आज खऱ्या अर्थाने साप निघाल्यानंतर तात्काळ सर्पमित्राला फोन करून बोलावले जाते. मात्र आजही काही ठिकाणी साप दिसताच त्याला ठेचून मारले जाते. निसर्गसाखळी सापाचे असणारे महत्व लक्षात घेता आज जिल्हा प्रशासनासह सर्पमित्रांनी व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे. सद्यस्थितीत राज्यातील विविध शहरात, गावात प्रशिक्षण घेतेलेले हजारो सर्पमित्र कार्यरत आहेत. दरम्यान, खऱ्या अर्थाने सर्पमित्र हे विनामूल्य सापांचा जीव वाचवतात. यासाठी प्रशासनाकडून विस्तृत मोहिम राबविण्याची गरज आहे. वनविभागाकडून सर्पमित्रांसाठी अधिकृत विविध प्रशिक्षणे राबविण्याची गरज आहे. मात्र वनविभागाच्या अनास्थेमुळे आज कुठेही सर्पमित्रांचे प्रशिक्षण अथवा जनजागृती होताना दिसून येत नाही. आजही सर्वसामान्यांमध्ये सापांबद्दल असणारी भीती कमी करून सापांना जीवदान देण्याची गरज आहे. सापांच्या असलेल्या विविध प्रकारच्या जाती तसेच त्यातील विषारी कोणत्या, बिनविषारी कोणत्या तसेच सापाचे निसर्गातील असलेले महत्व सर्पदंशानंतर करण्याचे येणारे प्राथमिक उपचार यासाठी वनविभागाने जनजागृती करण्याची गरज आहे. कोणाला साप आढळला तर सर्पमित्रांना बोलवावे, त्याला मारू नये, तरच खऱ्या अर्थाने आपण नागपंचमी सण साजरा होईल असे वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेने सांगितले.


सर्पांच्या संवर्धनासाठी शासनाकडून प्रशिक्षण आणि विविध योजना राबवणे आवश्यक
शासनाकडून सर्पमित्र खरंतर दुर्लक्षित झाले आहेत. निसर्गाच्या एका घटकाच्या संवर्धनासाठी सर्पमित्र बऱ्याच ठिकाणी जनजागृती करत आहेत तर अनेक सरपटणाऱ्या जीवाना जीवनदान देत आहेत.अनेक ठिकाणी सापांना पकडून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडतात. मात्र सापांचा जीव वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभवणारे सर्पमित्र आज शासनाकडून दुर्लक्षित झाले आहे. शासनाने सर्पमित्रांना अल्प मानधन सुरू करून विविध योजनेचा फायदा देण्याची गरज असल्याचे सर्पमित्रांकडून सांगण्यात येत आहे.

कायदा काय सांगतो?
वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम कायदा १९७२ अनुसार नाग, धामण व इतर साप अनुसूची १ आणि २ मध्ये समाविष्ट आहेत. त्यानुसार सापांना मारणे, पकडने, हाताळणे, त्यांना अवैधरित्या बंदीस्त करने तसेच त्यांचे प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तिस (मग तो सर्पमित्र असो वा गारूडी) ३ ते ५ वर्ष कारावास तसेच १० हजार ते १५ हजार रूपये दंडाची तरतूद आहे.

शेतात खऱ्या अर्थाने बळीराजाला हातभार लावणाऱ्या सापांना मारले जाते आणि दुसऱ्या बाजूला महागाच्या औषध फवारणी केली जाते हे हास्यास्पद आहे. याशिवाय शहरात साप दिसताच तो विषारीच आहे अथवा अंधश्रद्धेची जोड दिली जाते. मात्र नागरिकांनी यावर विश्वास न ठेवता सर्पमित्रांशी संपर्क साधने आवश्यक आहे. याशिवाय शासनाने शहरांसोबत ग्रामीण भागात प्रतिसर्प विष व व्हेंटिलेटर संख्या वाढवणे आवश्यक
- आदित्य पाटील, अध्यक्ष, वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई-ठाणे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in