
राज्याच्या राजकारणात सध्या कटुता वाढली आहे हे खरे आहे; मात्र राजकारणात कटुता असू नये. महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. सगळ्यांनीच त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मी देखील करेन; पण एक चांगले आहे की, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी माझा अद्यापही संवाद आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे यांना अद्याप दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत; पण त्या जरूर देऊ, असेही फडणवीस म्हणाले.
दिवाळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. एरव्ही राजकीय प्रश्नांना अतिशय सावध उत्तरे देणाऱ्या फडणवीस यांनी यावेळी अतिशय मनमोकळेपणाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. ‘‘सागर बंगल्यात मी खूश आहे, इथे खूप पॉझिटिव्ह वाटते. मला इतर कुठे जाण्याची इच्छा नाही,’’ असेही ते म्हणाले. ‘‘खाते कुठलेही असो, आपण मन लावून काम केले पाहिजे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे; पण खरे पाहिले तर पायाभूत सुविधांच्या संदर्भात काम करायला आवडते, कारण तिथे रिझल्ट लवकर देता येतो. गृहखाते सांभाळताना फार अलर्ट राहावे लागते,’’ असेही ते म्हणाले. राज्यमंत्री पदे लवकरच भरण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.