महापालिका शहर व उपनगरात सहा जलतरण तलाव होणार; मुंबई महापालिकेची १०० कोटींची तरतूद

मालाड आणि दहिसर पश्चिम येथील तरणतलावांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
महापालिका शहर व उपनगरात सहा जलतरण तलाव होणार; मुंबई महापालिकेची १०० कोटींची तरतूद

स्वस्थ आरोग्यासाठी पोहणे हा उत्तम व्यायाम आहे. मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी मुंबई महापालिका शहर व दोन्ही उपनगरांत नवीन सहा जलतरण तलाव निर्माण करत आहे. वरळी, भांडुप, मालाड, दहिसर, अंधेरी पूर्व आणि पश्चिम येथे ही सहा तरण तलाव होत असून, या कामासाठी मुंबई महापालिकेने तब्बल १०० कोटींची तरतूद केली आहे.

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि पाण्यातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, या चिंतेने मुंबई महापालिकेने तरणतलाव बंद केले होते. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यात पालिकेला यश आल्यानंतर प्रथम दादर शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी ऑलिम्पिक तरणतलाव सुरू केला. त्यानंतर हळुवार अन्य तरणतलाव सुरू करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मालाड आणि दहिसर पश्चिम येथील तरणतलावांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मालाड येथील तरण तलाव ऑगस्ट, तर दहिसर येथील सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. या तरणतलावांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर बनवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त किशोर गांधी यांनी दिली आहे.

चेंबूर तरण तलाव परिसरात ६० गाड्यांचे पार्किंग होईल, इतकी जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी पे अॅण्ड पार्कसाठी निविदा मागवल्या आहेत. त्याशिवाय सर्व तरण तलाव रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. असंख्य मुंबईकरांना दिवसा वेळ मिळत नसल्याने तरण तलाव संध्याकाळी ७ वाजता बंद न करता पहाटे ६ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत व महिलांसाठी दुपारच्या वेळेत सुरू ठेवण्याचे प्रस्तावित आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in