
राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडी आणखीनच मजबूत झाली आहे. आपली मते दुसरीकडे गेल्यास गडबड होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडी सोबतच राहण्याचे आदेश समाजवादी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आल्याने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे सपाचे आमदार अबू आझमी यांनी बुधवारी जाहीर केले.
राज्यसभा निवडणुकीतील मतदानाबाबत समाजवादी पक्षाने भूमिका स्पष्ट केली नव्हती. समाजवादी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून काही मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली होती. त्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेटही घेतली होती. त्यानंतर महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात अबू आझमी म्हणाले की, “आमचे प्रश्न व काही समस्यांबाबत पत्र लिहिले होते. या प्रश्नावर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी काही प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. महाविकास आघाडीच्या पाठिंब्याबाबत आमच्या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचे आम्हाला आदेश दिले आहेत. मत इतरत्र देऊ नका. दुसरीकडे मत गेल्यास गडबड होऊ शकते. त्यामुळे आम्ही राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला,” असे अबू आझमी म्हणाले.