पोलीस असल्याची बतावणी करुन दहा लाख पळविले

पाच टक्के कमिशन काढून उर्वरित पैसे त्याला द्या, असे सांगून त्यांना विलेपार्ले येथे बोलाविले होते
पोलीस असल्याची बतावणी  करुन दहा लाख पळविले

मुंबई : दोन हजाराच्या नोटांच्या बदल्यात पाचशे रुपयांच्या नोटा दिल्यास पाच टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसयिकाची पोलीस असल्याची बतावणी करुन पाचजणांच्या टोळीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या पाचही आरोपीविरुद्ध माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

जय मेहता, निलेश, राजेश, विनोद आणि आकाश अशी या पाचजणांची नावे आहेत. वृद्ध व्यावसायिक कुलाबा येथे राहत असून त्यांच्या मालकीचे वडाळा येथे एक वाईन शॉप आहे. २५ जुलैला त्यांचा परिचित धनराज नावाच्या एका मित्राने दोन हजाराचा नोटा बदली करायचे असल्यास त्यांना पाच टक्के कमिशन देतो, असे आमिष दाखविले होते. पाच टक्के कमिशन मिळत असल्याने त्यांनी त्यास होकार दिला होता. दोन दिवसांनी त्याने त्यांची विजय कोळीशी ओळख करुन दिली होती. २ ऑगस्टला विजयने त्यांना संपर्क साधून त्याच्याकडे एक पार्टी आहे. त्याच्याकडे पंधरा लाख रुपयांच्या दोन हजार नोटा आहेत. त्याला दोन हजाराच्या बदल्यात पाचशे रुपयांच्या नोटा पाहिजे आहे. तुमचे पाच टक्के कमिशन काढून उर्वरित पैसे त्याला द्या, असे सांगून त्यांना विलेपार्ले येथे बोलाविले होते. मात्र ठरलेल्या दिवशी त्यांची डिल पूर्ण झाली होती. ९ ऑगस्टला विजयने त्यांना फोन करुन वरळी येथे तुम्हाला पार्टी भेटेल, त्यांच्यासोबत त्यांना घनसोली येथे जायचे आहे. तिथे पैशांचा व्यवहार होईल असे सांगितले. त्यामुळे ते दहा लाखांच्या पाचशे रुपयांच्या नोटा घेऊन तिथे गेले होते. वरळी येथे गेल्यानंतर त्यांना कारमधून बसवून संबंधित व्यक्ती निघाले होते. पैशांचा व्यवहार सुरु असताना तिथे एका कारने त्यांच्या कारला ओव्हरटेक केले. या कारमधून दोनजण उतरले. त्यांनी पोलीस नाव असलेले मास्क लावले होते. त्यातील एका पकडून त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याचे नाटक करुन आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर ते त्यांच्याकडील दहा लाखांची कॅश घेऊन पळून गेले. मात्र त्यांच्याकडील दोन हजाराच्या नोटा न देता ते सर्वजण पळून गेले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी माटुंगा पोलिसांना ही माहिती सांगितली. त्यांच्यातील संभाषणवरुन त्यांची नावे जय मेहता, निलेश, राजेश, विनोद आणि आकाश असल्याचे समजले होते. त्यामुळे या पाचजणांविरुद्ध पोलिसांनी कट रचून पोलीस असल्याची बतावणी करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in