‘तिसरी मुंबई’ उभी राहणार ;राज्य सरकारची प्रस्तावाला मान्यता

मुंबईची लोकसंख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. मुंबईत जागेची कमतरता जाणवू लागल्यावर नवी मुंबई उभी राहिली.
‘तिसरी मुंबई’ उभी राहणार ;राज्य सरकारची प्रस्तावाला मान्यता
PM

मुंबई : मुंबईची लोकसंख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. मुंबईत जागेची कमतरता जाणवू लागल्यावर नवी मुंबई उभी राहिली. आता तीही कमी पडू लागल्याने ‘तिसरी मुंबई’ उभारण्याचे सरकारने ठरवले आहे. उत्कृष्ट पायाभूत सुविधा, उत्तम वाहतूक व्यवस्था व चांगली घरे पुरवण्यासाठी राज्य सरकारने ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याचे ठरवले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला हे प्रस्तावित शहर उभारले जाणार आहे. हे विमानतळ मुंबई शहराला शिवडी-न्हावा शेवा पुलाने जोडले जाईल. या पुलाचे उद‌्घाटन पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी सांगितले की, राज्य सरकारने या ‘तिसरी मुंबई’ शहराला हिरवा कंदील दिला आहे. एमएमआरडीए व न्यू टाऊन डेव्हलपमेंट ॲॅथॉरिटी (एनटीडीए) हे शहर वसवणार आहे. या शहराचे क्षेत्रफळ ३२३ चौरस किमी आहे. त्यात उलवे, पेण, पनवेल, उरण, कर्जत व त्या भोवतालच्या परिसराचा समावेश आहे. जवळपास २०० गावे या शहराच्या टप्प्यात येणार आहेत.

सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, या शहराचे नाव ‘तिसरी मुंबई’ असेल. विकसित शहरात असलेल्या सर्व पायाभूत सुविधा त्यात असतील. यात परवडणारी घरे, व्यावसायिक संकुले, मॉल्स, डेटा सेंटर, बँकांचे जाळे, वित्त संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या व नॉलेज पार्क आदी बाबी तेथे असतील. या शहरात नवीन पायाभूत प्रकल्प राबवले जातील. तसेच मजूबत स्थानिक दळणवळण व्यवस्था असेल, असे अधिकारी म्हणाला.

‘तिसऱ्या मुंबई’मुळे आर्थिक व्यवहारांना मोठी चालना मिळणार आहे. त्याचा देशाच्या विकासदराला मोठा फायदा मिळेल.

खारघरमध्ये दुसरी बीकेसी

खारघर येथे दुसरे वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) उभारण्याचा प्रस्ताव आहे. पूर्ण व्यावसायिक कामांसाठी १५० हेक्टर जमीन मिळण्याची शक्यता आहे. त्यात भारतीय व परदेशी कंपन्यांना आकर्षित केले जाईल, असे हे सूत्र म्हणाले. राज्य सरकारने एमएमआर विभाग विकसित करण्याचे ठरले आहे. कारण या भागात ०.२५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता आहे. मुंबई शहर ६०० चौरस किमी, नवी मुंबई ३४४ चौरस मीटर, तर ‘नैना’ प्रकल्प ३७० चौरस किमीचा आहे. तसेच त्यात १७४ गावांचा समावेश आहे.

जीडीपी वाढवण्याचे प्रयत्न

एमएमआरडीए व नीती आयोगाकडून मुंबईचा जीडीपीतील वाटा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील जीडीपीचा वाटा सध्या १४० अब्ज डॉलर्स आहे. तो २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तिसरी मुंबई उभारली जात आहे. एमएमआर विभागाचा ‘आर्थिक मास्टर प्लान’ तयार आहे.

शिवडी ते न्हावा शेवा पूल व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यातून भारताच्या जीडीपीच्या टक्क्यात एक टक्क्याने वाढ होऊ शकते. नवी मुंबई विमानतळ २०२४ च्या डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी होईल. तसेच दळणवळणाच्या साधनात वाढ होईल. नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात २० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक वर्षात होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in