

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात राबविण्यात येत असलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसऱ्या फेरीनंतरही तब्बल १ लाख ४६ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष फेरीत विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळाल्यानंतरही प्रवेश नाकारल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील अकरावी प्रवेशाची पहिली विशेष फेरी शुक्रवारपासून सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना तिन्ही फेऱ्यात प्रवेश मिळालेला नाही, त्यांना ३१ जुलै पर्यंत नव्याने नोंदणी करता येणार आहे. विशेष फेरीची गुणवत्ता यादी ५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार दहा महाविद्यालयाची निवड करावी लागते. त्यामुळे महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरताना अनेकदा विद्यार्थी कमी टक्केवारी असली तरी नामवंत महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरतात. मात्र महाविद्यालयांचा कटऑफ अधिक असतानाही कमी गुण मिळालेले विद्यार्थीही नामवंत महाविद्यालयांची नावे अर्जात भरतात.
त्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी आणि संबंधित महाविद्यालयाचा कटऑफ याचा ताळमेळ लागत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागते. पहिल्या फेरीपासून असे अनेक विद्यार्थी प्रवेश फेरीत अर्ज करतात; मात्र पसंतीक्रम चुकीचा भरल्याने विद्यार्थास प्रवेश मिळत नाही.
५६ हजार ७५७ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण
विशेष फेरीत विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम योग्य दिल्यास त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. अन्यथा विशेष फेरीतूनही प्रवेशापासून दूर राहावे लागणार आहे. टक्केवारी कमी असतानाही विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांचा पर्याय निवडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची पुन्हा प्रतिक्षा करावी लागते. एमएमआर क्षेत्रात १०४७ महाविद्यालयांमध्ये ४ लाख ०२ हजार ४५ जागा उपलब्ध होत्या. शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या प्रवेश फेऱ्यांमध्ये फक्त ५६ हजार ७५७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. तर १ लाख ४६ हजार ३१५ विद्यार्थी चौथ्या आणि विशेष फेरीच्या प्रतीक्षेत आहेत.