नालेसफाईचे काम जोरात; आता रात्रीही गाळ उपसा

नालेसफाईच्या कामावर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असून सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाणार आहे. कामावर नजर ठेवण्यासाठी सबइंजिनीयरची नेमणूकही करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
नालेसफाईचे काम जोरात; आता रात्रीही गाळ उपसा

मुंबई : यंदा नालेसफाईच्या कामाला उशीरा सुरुवात झाली असली तरी ३१ मेपर्यंत ७५ टक्के नालेसफाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आता तीन शिफ्टमध्ये गाळ उपसा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यात लहान नाल्यातील गाळ उपसा करण्याचे काम रात्रीही सुरू केल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. दरम्यान, नालेसफाईला कामाला गती आली असून १५ दिवसांत म्हणजे १ एप्रिलपर्यंत कंत्राटदाराच्या माध्यमातून १६.५१ टक्के नालेसफाई झाली आहे. तर मिठी नदीची ४८.५८ टक्के सफाई करण्यात आली आहे. ३१ मे पूर्वी १०.२१ लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे नियोजन महापालिकेचे आहे. दरम्यान, नालेसफाईच्या कामावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

गेल्या वर्षी ६ मार्चपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र यंदा १८ मार्चपासून मिठी नदी, लहान व मोठे नाले यांच्या सफाई कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शहर व उपनगरांतील लहान-मोठ्या नाल्यातील एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य असून त्यापैकी १,६८,६७४.७७ मेट्रिक टन (१६.५१ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. मिठी नदी, लहान-मोठे नाले, हायवेलगतचे नाले यांच्या सफाईचे २४९.२७ कोटी रुपयांचे कंत्राट काम ३१ कंत्राटदारांवर सोपवले आहे.

मुंबईत ३१ मेपूर्वी नद्या, नाल्यांमधून एकूण १०,२१,७८१.९२ मेट्रिक टन इतका गाळ काढणे अपेक्षित आहे. १८ मार्च ते १ एप्रिल या १५ दिवसांत कंत्राटदारांनी १,६८,६८४.७७ मे. टन (१६.५१ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. शहर भागात नालेसफाई कामाअंतर्गत ३०,९३९.९४ मे. टन इतका गाळ काढणे अपेक्षित असून गेल्या १५ दिवसांत त्यापैकी १,७५०.१४ मे.टन (५.६३ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. पूर्व उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत १,२३,५५३.०५ मे. टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी १५,७९०.७८ मे.टन (१२.७८ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे.

पश्चिम उपनगरात नालेसफाई कामाच्या अंतर्गत २,३५,०२०.९४ मे. टन गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी ३०,४२९.१२ मे. टन (१२.९४ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. मिठी नदी पात्रातून पावसाळ्यापूर्वी २,१६,१७४.६९ मे. टन इतका गाळ काढणे अपेक्षित असून आतापर्यंत त्यापैकी १,०५,०१४.७३ (४८.५८ टक्के) गाळ काढण्यात आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

नालेसफाईच्या कामावर सीसीटीव्हीची नजर

नालेसफाईच्या कामावर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असून सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवली जाणार आहे. कामावर नजर ठेवण्यासाठी सबइंजिनीयरची नेमणूकही करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शिवाय गाळ काढल्यानंतर शहराबाहेर विल्हेवाटीसाठी नेण्याआधी रिकाम्या डम्परचा फोटो, डम्पर भरल्यानंतरचा फोटो आणि डम्पर रिकामा केल्यानंतरचा फोटोही घेतला जाणार आहे. त्यामुळे नालेसफाई परिणामकारक होणार असल्याचा पालिकेचा दावा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in