यंदा गणेश भक्तांची कृत्रिम तलावाकडे पाठ

पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत नसून समुद्रजीवाला धोका वाढतो.
यंदा गणेश भक्तांची कृत्रिम तलावाकडे पाठ

दोन वर्षांनंतर मुंबईत गणेशोत्सवाची धूम पाहावयास मिळाली. भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक स्थळी करण्यात भक्तांनी पसंती दिली आहे. २०२१मध्ये कृत्रिम तलावात ८२ हजार ६१ गणेशमूर्तींचे १० दिवसांत विसर्जन करण्यात आले होते; मात्र यंदा २०२२ मध्ये १० दिवसांत कृत्रिम तलावात ६६ हजार १२७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा भक्तांनी कृत्रिम तलावाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत नसून समुद्रजीवाला धोका वाढतो. त्यामुळे पीओपीच्या गणेशमूर्ती ऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा आणि कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करा, असे आवाहन पालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना करणाऱ्या भक्तांना केले होते; मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावाकडे पाठ फिरवली आहे.

गेल्या वर्षी ११ सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन झाले आणि १९ सप्टेंबर रोजी १० दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गेल्या वर्षी एकूण १ लाख ६५ हजार ४० गणेशमूर्ती, गौरींचे विसर्जन केले होते. त्यापैकी कृत्रिम तलावात ८२ हजार ६१ गणेशमूर्ती व गौरींचे विसर्जन केले. यंदा मात्र भाविकांनी समुद्रात विसर्जन करण्यालाच प्राधान्य दिले.

बंदी असूनही डीजेचा वापर

विसर्जन मिरवणुकीत बँजो आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषणदेखील वाढलेले दिसले. ऑपेरा हाऊस विभागात सर्वाधिक म्हणजेच १२०.२ डेसीबल आवाजाची नोंद झाल्याचे आवाज फाउंडेशनच्या प्रमुख सुमायरा अब्दूलली यांच्याकडून सांगण्यात आले. यंदाचे ध्वनिप्रदूषण गेल्या वर्षीच्या तुलनेत ज्यास्तअसल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. अोपेरा हाऊस येथे १२० डेसीबल, गिरगाव येथे १०६.९, वरळी येथे १०५, शास्त्रीनगर येथे १०८, माटुंगा येथे १०३, शिवाजी पार्क येथे ९९ डेसिबल ध्वनिप्रदूषणाची नोंद करण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in