यंदाच्या वर्षी पीओपीच्या गणेशमूर्ती विराजमान करण्यास राज्य सरकार व मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे, तरीही गणेशभक्तांनी शाडूच्या मातीच्या मूर्तींना पसंती दिली आहे. गेल्या काही दिवसांत शाडू मातीच्या मूर्तींच्या मागणीत वाढ झाल्याचे डिलाइल रोड येथील मूर्तिकार राजन झाड यांनी सांगितले.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साजरा करण्यास निर्बंध होते; मात्र यंदा चौथ्या लाटेचे संकट असले तरी धोका कमी असल्याने गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करता येणार आहे. जगभरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची परंपरा व आनंद थोडा हटकेच असतो. ३१ ऑगस्ट रोजी सगळ्यांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून भक्तगण स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
मुंबईत यावर्षी पीओपीच्या मूर्तींना परवानगी असली तरी घरगुती आणि मंडळांकडून गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांकडे शाडूच्याच मूर्तीची मागणी करण्यात येत आहे. दरवर्षी पीओपीच्या मूर्ती बनवणार्या मंडळांपैकी १५ ते २० टक्के मंडळांनी आणि घरगुती उत्सवासाठी सर्वाधिक शाडूच्याच मूर्तींची मागणी करण्यात येत आहे.