यंदा पावसाळ्यात मध्य रेल्वे खोळंबली नाही !

कधीही न थांबणारी मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल सेवा पावसाळ्याच्या दिवसात अनेकवेळेस विस्कळीत होते
यंदा पावसाळ्यात मध्य रेल्वे खोळंबली नाही !
Published on

पावसाळ्याच्या दिवसात उपनगरीय रेल्वे मार्गावरील बहुतांश ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचणे, पूर परिस्थिती निर्माण होते. यामुळे रेल्वे वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. या घटना लक्षात घेता मध्य रेल्वेने एप्रिल महिन्यापासून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केली. या कामांमुळे यंदा मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांवर पाणी साचणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड या घटना रोखण्यात १०० टक्के यश आले असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मान्सून पूर्व कामामुळे अशा घटना घडल्या क्वचितच घडल्या आहेत.

कधीही न थांबणारी मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल सेवा पावसाळ्याच्या दिवसात अनेकवेळेस विस्कळीत होते. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रेल्वे रुळांमध्ये साचणे, ओव्हरहेड वायरींमध्ये बिघाड, नाल्यातून कचरा सर्वत्र पसरणे, रेल्वे मार्गांच्या आजूबाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या रेल्वेवर पडणे या सर्व घटनांमुळे रेल्वे बऱ्याचदा ठप्प होते. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.

याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आपली कंबर कसत एप्रिल महिन्यापासून मान्सून पूर्व कामांचा धडाका लावला.

मान्सून समस्यांचे आव्हान लावले परतवून

मान्सून पूर्व कामांमध्ये पावसाळ्याच्या दृष्टीने नालेसफाई, रेल्वे रुळांची दुरुस्ती देखभाल, गटारांची स्वच्छता करण्यात आली. तसेच ज्याठिकाणी झाडांच्या फांद्या छाटण्याची आवश्यकता आहे, तेथे छाटणी करण्यात आली. यासोबतच कल्याण-कर्जत मार्गावर पाणी साचू नये म्हणून पंप बसविण्यात आले. तसेच मध्य रेल्वे मार्गावरील पाणी साठणारी दादर, कुर्ला, ठाणे ही स्थानके निश्चित करत नालेसफाई, कल्व्हर्ट, ड्रेनेजसारख्या कामांवर भर देण्यात आला. दरम्यान, प्रशासनाने धीम्या गतीने का होईना मान्सूनची तयारी सुरू करत मान्सून समस्यांचे आव्हान परतवून लावले आहे.

logo
marathi.freepressjournal.in