यंदा ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचा आकडा वाढला:मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २२९ जणांवर कारवाई ;२ हजार ८१० वाहनचालकांना दंड

३१ डिसेंबरला पोलिसांनी ११२ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम पहाटेपर्यंत सुरू होती.
यंदा ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचा आकडा वाढला:मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २२९ जणांवर कारवाई ;२ हजार ८१० वाहनचालकांना दंड

मुंबई : थर्टीफर्स्ट साजरी करताना मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही मुंबईकरांनी या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे दिसून आले. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २२६ जणांवर कारवाई करण्यात आली, तर रात्री उशिरापर्यंत ९ हजार २५ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात २ हजार ८१० वाहनचालकांवर विविध कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा ड्रंक ॲण्ड ड्राईव्हचा आकडा वाढला होता. शहरात वाहतूक पोलिसांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी ठेवल्यामुळे रात्री उशिरा कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुंबईकरांच्या उत्साहाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सर्वच अतिरिक्त पोलीस आयुक्त, २२ पोलीस उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ४५० पोलीस निरीक्षक, १६०१ पोलीस अधिकारी, ११ हजार ५०० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आला होता; मात्र उत्साहाच्या नादात अनेकांनी नियमांचे सर्रासपणे उल्लघंन केल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले.

११२ ठिकाणी विशेष नाकाबंदी

३१ डिसेंबरला पोलिसांनी ११२ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम पहाटेपर्यंत सुरू होती. यावेळी पोलिसांनी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या २२९ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली. तपासणीदरम्यान विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या २ हजार ४१०, विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या ३२०, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या ८० वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने संवेदनशील ठिकाणी अशा ६१८ ठिकाणी तपासणी करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in