यंदाचा ऑगस्ट शतकातील सर्वात कोरडा

देशात सरासरीपेक्षा कमी पावसाने पिकांची स्थिती बिकट
यंदाचा ऑगस्ट शतकातील सर्वात कोरडा

मुंबई : ऑगस्ट महिन्यात पावसाने थोडी अधिकच ओढ दिल्याने देशात पिकांची स्थिती बिकट बनली असून, यंदाचा ऑगस्ट महिना गेल्या शतकातील सर्वात कोरडा ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरवर्षी भारतात ऑगस्ट महिन्यात सरासरी २५४.९ मिलीमीटर (१० इंच) पाऊस पडतो. यंदा मान्सूनची प्रगती सुरुवातीपासूनच फारशी समाधानकारक नसल्याने हवामान खात्याने ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा ८ टक्के कमी पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, यंदा ऑगस्ट महिन्याच्या १७ तारखेपर्यंत देशात सरासरी केवळ ९०.७ मिमी (३.६ इंच) इतकाच पाऊस पडला आहे. हा पाऊस दरवर्षीच्या सरासरीपेक्षा ४० टक्के कमी आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत देशात सरासरी १८० मिमी (७ इंच) पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यापूर्वी २००५ साली ऑगस्ट महिन्यात १९१.२ मिमी (७.५ इंच) इतका कमी पाऊस पडला होता. त्यामुळे यंदाचा ऑगस्ट महिना गेल्या शंभर वर्षांतील सर्वात कोरडा ठरण्याची शक्यता आहे.

भारताची सुमारे २ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बरीचशी पावसावर अवलंबून आहे. यापैकी ७० टक्के पाऊस मान्सूनमुळे पडतो. देशात १९०१ साली पावसाच्या शास्त्रीय नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली. तेव्हापासूनच्या नोंदींची तुलना करता यंदा देशात जून महिन्यात सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस पडला. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस पडल्याने ही कमी काही प्रमाणात भरून निघाली. ऑगस्टमध्ये नेहमी साधारण पाच-सहा दिवस उघडीप असते, पण यंदा ऑगस्ट महिन्यातील पंधरवड्यापेक्षा अधिक काळ पावसाने ओढ दिली आहे.

रखडलेल्या पावसाचा देशातील शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. सामान्यपणे देशात उन्हाळ्याच्या अखेरीस आगामी पावसाच्या अपेक्षेने शेतकरी पेरणीला सुरुवात करतात. भात, मका, कापूस, सोयाबीन, ऊस, भुईमूग आदी पिकांची लावणी या काळात होते. सुरुवातीचे काही दिवस जमिनीत साठलेल्या ओलाव्यावर त्यांची वाढ होते, पण यंदा उन्हाळा अधिक तीव्र होता आणि पावसाळा सुरू होण्यास वेळ लागला. त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी पुरेसा ओलावा उपलब्ध होऊ शकला नाही. परिणामी, शेतीच्या या हंगामात या सर्व पिकांची वाढ खुंटली असून, दिवाळीच्या सुमारास बाजारात पुरेसे धान्य उपलब्ध होणार नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

अल-निनोचा परिणाम

पावसातील ही अनियमितता अल-निनो परिणामामुळे असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय पट्ट्यात पाण्याचे तापमान वाढले आहे. त्याचा परिणाम दक्षिण आशियातील मान्सूनवर होत आहे. गेल्या सात वर्षांत प्रथमच अल-निनोचा इतका विपरीत परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे देशाच्या दक्षिण, पश्चिम आणि मध्य प्रांतांत पावसाची कमतरता भासेल. पुढील १५ दिवसांत देशाच्या ईशान्य आणि मध्य भागात पावसाची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, पण वायव्य आणि दक्षिणेकडील भागात कोरडी स्थिती कायम राहील. त्याने पीकस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in