भाजपसोबत गेलेल्यांना आता घरवापसी नाही! शरद पवार यांची स्पष्टोक्ती

अदानी आणि माझे संबंध विकासाच्या मुद्यावरचे असल्याचंही शरदत पवार यावेळी म्हणाले.
भाजपसोबत गेलेल्यांना आता घरवापसी नाही! शरद पवार यांची स्पष्टोक्ती

मुंबई : अजित पवार आणि तुमचे अनेक जुने सहकारी तुमचा पक्ष सोडून गेले, तरीही तुम्ही सणवाराचे निमित्त करून एकमेकांना भेटता. प्रफुल्ल पटेल यांनाही भेटता. तास-दोन तास चर्चा करता, तुमचे चॅटिंगही सुरू असते, मग लोकांनी काय समजायचे? तुम्ही इंडिया आघाडीसोबत राहायचे आणि अजित पवारांनी आता भाजपसोबत राहायचे आणि लोकसभा निवडणुकीनंतर परत यायचे, असे काही तुमच्या कुटुंबाचे ठरले आहे काय? या थेट प्रश्नावर शरद पवारांनी 'भाजपसोबत गेलेल्यांना मी परत घेणार नाही', असे नि:संदिग्ध उत्तर दिले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली. राहुल गांधी विशेषतः त्यांच्या भारत यात्रेनंतर देशात त्यांची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळे भाजपविरोधात देश त्यांना गांभीर्याने साथ देईल असा माझा विश्वास आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

गौतम अदानी यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने गंभीर आरोप करीत आहेत, तुम्ही इंडिया आघाडीचे घटक पक्ष असूनही गौतम अदानींच्या संपर्कात असता, याचे कारण काय? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, जिथे विकासाचा विषय असतो तिथे मी आवर्जून जातो. गेल्या दहा वर्षांपासून अहमदाबादला असलेल्या दुग्ध व्यवसायातील आमच्या भागातील कल्पक उद्योजकाच्या प्रकल्पाच्या उद‌्घाटनाला मी गेलो होतो. तिथे अदानीही होते. त्यांचे माझे संबंध विकासाच्या मुद्यावरचेच आहेत.

केंद्रातील मोदी सरकार तपास यंत्रणाचा गैरवापर करून विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्तीला रोखण्यासाठी इंडिया आघाडी मजबुतीने समोर आली आहे. विरोधी पक्षांत काही मुद्यांवरून राजकीय मतभेद आहेत, मात्र ईडी, आयकर, सीबीआय यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवल्याने विरोधकांची आघाडी आणखी मजबूत होईल आणि भाजपसमोर समर्थ पर्याय उभा करेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

आपबद्दल बोलताना शरद पवार यांनी दिल्लीत आप आणि कॉंग्रेस एकत्रितच लढतील. तशी बोलणीही झाली आहेत. खरे म्हणजे दिल्लीत लोकसभेच्या ७ जागा आहेत. तेथे कॉंग्रेस शून्य स्थितीत आहे. अशावेळीदेखील ७ पैकी ३ जागा कॉंग्रेसला द्यायला आप तयार आहे. त्यामुळे जागावाटपावरून वाद होण्याचा प्रश्नच येत नाही, असे म्हटले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली आहे. अजित पवार आणि आणखी ज्येष्ठ नेते भाजपसोबत गेले आहेत आणि तुम्ही आणि सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेते इंडिया आघाडीसोबत आहेत, अशावेळी कार्यकर्ते संभ्रमात राहणार नाहीत का, असे विचारले असता शरद पवार यांनी आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजपविरोधात आमचा लढा कायम सुरू राहील. कार्यकर्त्यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही, असे स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in