मुंबई विमानतळ प्रशासनाला धमकीचा मेल; "एक दशलक्ष डॉलर्स बिटकॉइनमध्ये द्या, अन्यथा..."

सहारा पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
मुंबई विमानतळ प्रशासनाला धमकीचा मेल; "एक दशलक्ष डॉलर्स बिटकॉइनमध्ये द्या, अन्यथा..."
Published on

मुंबई पोलिसांचं टेन्शन दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. प्रत्येक एक-दोन दिवसांनी पोलिसांना धमकीचे फोन येत आहेत. अशातच आता पुन्हा एक धमकीचा ई-मेल आला आहे. पण यावेळी ई-मेल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये नाही आला तर थेट मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका ई-मेलवर आला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं टर्मिनल 2 बॉम्बनं उडवून देण्याची धमकी या ई-मेलमध्ये देण्यात आली आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर गुरुवारी बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. हा मेल वाचून एअरपोर्ट प्रशासनाची चांगलीच झोप उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीनं हा स्फोट टाळण्यासाठी 48 तासांच्या आत एक दशलक्ष डॉलर्स तेही बिटकॉइनमध्ये भरण्याची मागणी केली आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की, सहारा पोलिसांनी या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं quaidacasrol@gmail.com हा ईमेल आयडी वापरुन धमकीचा ईमेल पाठवला आहे.

धमकीचा ईमेल आल्यानंतर ताबोडतोब मुंबई पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं गुरुवारी सकाळी 11 वाजून 6 मिनिटांनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या फीडबॅक इनबॉक्समध्ये हा ई-मेल पाठवला होता. आरोपीनं धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "तुमच्या विमानतळासाठी हा शेवटचा इशारा आहे. असं न झाल्यास, आम्ही विमानतळाच्या टर्मिनल 2 वर 48 तासांच्या आत बॉम्बस्फोट करू, अन्यथा आम्हाला बिटकॉइनमध्ये एक दशलक्ष डॉलर्स पाठवले जातील आणि 24 तासांनंतर दुसरा इशारा दिला जाईल.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धमकावणं आणि खंडणी मागितल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम 385, 505(1) (बी) अन्वये एफआयआर नोंदवला आहे. धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचं प्रयत्न पोलीसांकडून सुरु आहेत.

logo
marathi.freepressjournal.in