उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

या प्रकरणी गुन्हा नोंद होताच डी. बी. मार्ग पोलिसांनी दहिसर येथून विष्णू विधू भौमिक या दागिने व्यापाऱ्याला अटक केली आहे.
उद्योगपती  मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी
Published on

विख्यात उद्योगपती आणि रिलायन्स उद्योगसमूहाचे मालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आल्याने स्वातंत्र्यदिनी एकच खळबळ उडाली होती. धमकी देणाऱ्याचा कसून शोध सुरू असतानाच या प्रकरणी गुन्हा नोंद होताच डी. बी. मार्ग पोलिसांनी दहिसर येथून विष्णू विधू भौमिक या दागिने व्यापाऱ्याला अटक केली आहे.

मानसिक तणावातून त्याने ही धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याची लवकरच पोलिसांकडून वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रँटरोड येथील रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाच्या लँडलाईनवर सकाळी १० वाजल्यापासून ते १२.०४ मिनिटापर्यंत आठ ते नऊ कॉल आले होते. या कॉलवरून अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यापूर्वी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ एक स्फोटके असलेली कार सापडली होती. या घटनेनंतर त्यांच्या निवासस्थानी मुंबई पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी तब्बल आठ ते नऊ वेळा आलेल्या धमकीच्या कॉलमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डी. बी. मार्ग पोलिसांना ही माहिती दिली होती.

या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान हा कॉल दहिसर येथील नॅन्सी कॉलनी परिसरातून आल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर दहिसर पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून विष्णू भौमिक या ५६ वर्षांच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

logo
marathi.freepressjournal.in