
मुंबई : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना ई-मेलच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. वीस कोटी रुपये दिले नाही तर गेम करणार असल्याचा मजकूर मेलवर नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुकेश अंबानींकडून मेलला प्रतिसाद न मिळाल्याने या व्यक्तीने त्यांना दुसरा मेल पाठवून पुन्हा धमकी दिली आहे. दरम्यान, या धमकीची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह सायबर सेल आणि गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मुकेश अंबानी यांचा स्वत:चा मेल आयडी असून २७ ऑक्टोबरला या मेलवर त्यांना शादाब खान नावाच्या एका व्यक्तीकडून एक मेल आला होता.
या मेलमध्ये या व्यक्तीने त्यांच्याकडे वीस कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाही तर त्यांचा गेम करणार, अशी धमकी दिली आहे. मात्र, त्यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नव्हते. ही माहिती नंतर मुकेश अंबानी यांच्याकडून गावदेवी पोलिसांना देण्यात आली होती. पहिल्या मेलला प्रतिसाद न दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने मुकेश अंबानी यांना दुसरा मेल पाठविला होता. त्यात त्याने माझ्या मेलला तुम्ही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यू वॉरंटवर स्वाक्षरी झाली असून आमच्याकडे चांगले शूटर आहेत. आता तुम्हाला वीस कोटी रुपये नव्हे दोनशे कोटी द्यावे लागतील, नाहीतर होणाऱ्या परिणामाला तयार राहा, असा मजकूर नमूद केला आहे.
दरम्यान, या घटनेची मुंबईचे पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.