बीटकॉईनद्वारे शिक्षिकेला साडेतीन लाखांचा गंडा ; सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली
बीटकॉईनद्वारे शिक्षिकेला साडेतीन लाखांचा गंडा ; सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
Published on

बीटकॉईन गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल, असे सांगून एका शिक्षिकेची सुमारे साडेतीन लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

विक्रोळीत राहणाऱ्या २८ वर्षीय तक्रारदार शिक्षिका नवी मुंबईतील एका शाळेत बायोलॉजी विषयाची शिक्षिका म्हणून काम करते. गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर बीटकॉईन गुंतवणुकीसंदर्भात एक पोस्ट तिच्या वाचण्यात आली. याचदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करून तिला बीटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला. दोघांमध्ये झालेल्या संभाषणानंतर त्याने तिला गुगल पेवरून एक ॲॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तिने हे ॲॅप डाऊनलोड करून ३० हजार रुपये जमा केले. या रक्कमेवर तिला दोन लाख मिळतील, असे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर तिने पुन्हा ४० हजार रुपयांची गुंतवणूक केली. टप्प्याटप्प्याने तिने साडेतीन लाख रुपये जमा केले.

नफ्याची रक्कम काढताना तिला आणखीन पैसे जमा करण्याचे मॅसेज येऊ लागले. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच तिने विक्रोळी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलिसांसह सायबर सेल विभागाचे अधिकारी संमातरपणे करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in