मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या तिघांना अटक ;गुजरात येथून ताब्यात घेतले

अटकेनंतर या तिघांनाही पुढील चौकशीसाठी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसाकडे सोपविण्यात आले
मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या तिघांना अटक ;गुजरात येथून ताब्यात घेतले
PM

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह मुंबईत ११ ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुजरात येथून अटक केली. मोहम्मद अर्शिल मोहम्मद इक्बाल टोपाला, आदिलभाई रफिकभाई मलिक आणि वसीमराजा अब्दुल रज्जाक मेमन अशी या तिघांची नावे असून ते तिघेही वडोदराचे रहिवासी आहेत.

फोर्ट येथील शहीद भगतसिंग रोडवर रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय असून मंगळवारी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर आलेल्या एका मेलद्वारे, मुंबई शहरात विविध ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेसह इतर खासगी बँकांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. भारताच्या इतिहासातील हा आतापर्यंत सर्वांत मोठा घोटाळा असून त्याला आरबीआयचे गर्व्हनर शक्तीकांत दास, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह काही खासगी बँकेचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. या घोटाळ्यासंदर्भात त्याच्याकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे त्याने रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखा, चर्चगेट येथील एचडीएफसी आणि बीकेसीच्या आयसीआयसीआय बँकेसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत. संबधितांनी तातडीने त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. या राजीनाम्याची एक प्रसिद्धीपत्र काढून या घोटाळ्याबाबत माहिती द्यावी. तसेच दोषीवर कठोर कारवाई व्हावी असे आवाहन त्याने केंद्र सरकारकडे केली होती. त्याची मागणी मान्य झाली नाहीतर दुपारी दीडनंतर एकपाठोपाठ एक बॉम्बस्फोट घडवून आणेल, अशी धमकी दिली होती.

या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेसह सायबर सेलला तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान हा मेल गुजरातच्या वडोदरा येथून आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर विशेष पथकाने तिथे जाऊन मोहम्मद अर्शिल, वसीमराजा आणि आदिलभाई या तिघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर या तिघांनाही अटक करून पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. यातील मोहम्मद अर्शिलने धमकीचा मेल पाठविल्याची कबुली दिली. त्याने बीबीएची पदवी घेतली असून सध्या तो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम करतो. वसीमराजा हा त्याचा भावोजी असून त्याचे पानविडीचे एक दुकान आहे. आदिलभाई त्याचा मित्र असून त्याने बोगस दस्तावेज सादर करून एक सिमकार्ड घेतले होते. ते सिमकार्ड त्याने वसीमराजला आणि नंतर मोहम्मद अर्शिलला दिले होते. या सिमकार्डवरुन त्याने स्वत:च्या मोबाईलवरून हा धमकीचा मेल पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अटकेनंतर या तिघांनाही पुढील चौकशीसाठी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसाकडे सोपविण्यात आले आहे. या तिघांची पोलिसाकडून कसून चौकशी सुरू असून धमकीचा मेल पाठविण्यामागील कारणांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांकडून गुन्ह्यांतील मोाबईल, सिमकार्डसह इतर दस्तावेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धमकी देण्यामागे त्यांचा काय उद्देश होता. त्याने कोणाच्या सांगण्यावरून ही धमकी दिली होती का, या गुन्ह्यांत अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in