मुंबई : दोन वेगवेगळ्या कारवाईत घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या तीन आरोपींना ट्रॉम्बे आणि पंतनगर पोलिसांनी अटक केली. चेतन संजय माळी, मोहम्मद मुनिश मोहम्मद नैमुद्दीन खान ऊर्फ टर्रा आणि मोहम्मद मुकद्दर मोहम्मद अनीस पठाण अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी चार देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा, चार मॅगझीन, अकरा राऊंड आणि गुन्ह्यांतील एक रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून या तिघांना अटक करण्यात आली आहे.
याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मानखुर्द आणि घाटकोपर येथे काही तरुण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पंतनगर आणि ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर ट्रॉम्बे पोलिसांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता साध्या वेशात पाळत ठेवून चेतन माळीला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यावर पोलिसांना चार देशी पिस्तूल, चार मॅगझीन आणि आठ जिवंत काडतुसे सापडली.