पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या महिलांसह तिघांना अटक

पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना मालवणी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद अक्रम हनीफ अन्सारी ऊर्फ अब्दुल कय्युम अन्सारी, निलोफर अक्रम अन्सारी आणि अमिना अब्दुल अन्सारी अशी या तिघांची नावे आहेत.
पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या महिलांसह तिघांना अटक

मुंबई : पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना मालवणी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद अक्रम हनीफ अन्सारी ऊर्फ अब्दुल कय्युम अन्सारी, निलोफर अक्रम अन्सारी आणि अमिना अब्दुल अन्सारी अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्यासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यात ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोहम्मद अक्रम हा मालाडच्या मालवणी परिसरात राहतो. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह गंभीर दुखापत शिवीगाळ करणे तसेच गंभीर दुखापतीसह हत्येचा प्रयत्न, मारामारी अशा दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद आहे. या दोन्ही गुन्ह्यांत तो वॉण्टेड आरोपी आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी गेल्या चार वर्षांपासून मालवणी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देत होता. ही शोधमोहीम सुरू असताना मोहम्मद अक्रम हा त्याच्या आई आणि पत्नीला भेटण्यासाठी मालवणी परिसरात आला होता. तो अंबुजवाडी, पारधीवाडीसमोरील रोडवर तीन महिलांसोबत बोलताना एका खबऱ्याने पाहिले होते. ही माहिती खब कडून मिळताच मालवणी पोलिसांचे एक विशेष पथक तिथे रवाना झाले होते. मात्र पोलिसांना पाहताच तो पळू लागला. यावेळी त्याची पत्नी निलोफर, आई अमीना तसेच अन्य एका महिलेने पोलिसांच्या कामात अडथळा आणून त्याला पळून जाण्यास मदत करून पोलीस पथकावर हल्ला केला होता. या झटापटीत अक्रमसह अन्य एक महिला पळून गेली होती. त्यानंतर या पथकाने पोलिसांवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निलोफर आणि अमीना या दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. काही वेळानंतर पथकाने पळून गेलेल्या अक्रमला ताब्यात घेतले.

logo
marathi.freepressjournal.in