राज ठाकरेंसह काँग्रेसचे तीन नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गेल्या तीन महिन्यांत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात झालेली ही तिसरी भेट आहे
राज ठाकरेंसह काँग्रेसचे तीन नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सध्या राज्यातील वातावरण तापले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे तीन बडे नेतेही वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होतो की काय, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेकडून भाजपला पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या तीन महिन्यांत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात झालेली ही तिसरी भेट आहे. यावेळी भाजपचे नेते मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि अमिन पटेल या काँग्रेसच्या तीन नेत्यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे समजते.

पुणेकरांना महापालिकेने पाठवलेल्या मिळकत करवसुलीच्या नोटिसांसदर्भातील एक पत्र देण्यासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. “पुणे महापालिकेने अचानक शहरांत पूर्वलक्षी प्रभावाने मिळकत करवसुलीच्या नोटिसा पुणेकरांना पाठवल्या आहेत. १९७०च्या एका ठरावाप्रमाणे करपात्र मूल्यात कायद्यातील तरतुदीप्रमाणे मिळकत करात काही सूट दिली जात होती. २०१९ला ही सूट विखंडित करण्यात आली. मधल्या ४८ वर्षांच्या काळात महालेखा परीक्षणात एकही आक्षेप आलेला नसताना ही सूट विखंडित का केली?,” असा सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

तूर्तास या निर्णयाला स्थगिती दिलेली असली, तरी यावर कायमस्वरूपी निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

शिंदे गट आणि भाजप एकत्रितपणे अंधेरी पोटनिवडणुकीला सामोरे जात असून भाजपने मुरजी पटेल यांनी उमेदवारी दिली आहे. त्यावरून या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती. त्यांनतर राज ठाकरेंनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी जात बाप्पाचे दर्शन घेतले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in