हवामान खात्याकडून तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
 हवामान खात्याकडून तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान खात्याकडून राज्यात पुढील तीन दिवस म्हणजे  ८ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १००.१ मिमी पाऊस झाला आहे.पावसाचा जोर आणखी वाढत असल्याने पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९३.९ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही. सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सकाळी ८ वाजेपर्यंत उल्हास नदीची पातळी १२.९० मीटर एवढी होती तर नदीची इशारा पातळी १६.५० मोटर तर धोका पातळी १७.५० मीटर एवढी आहे. जिल्हात सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३५ मिमी. पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही.  सावित्री, कुंडलिका तसेच इतर मोठ्या नद्या धोका पातळीच्या खाली वाहत असून कशेडी घाट मार्गातील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पोलादपूर, महाड व माणगाव येथील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील ५७८ कुटुंब म्हणजे एकूण १७१६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आता पर्यंत जिल्ह्यात १४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच ३ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात दोन   एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे. तसेच जिल्ह्यात एका घराचे पूर्णतः तर १४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात एक एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिथिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतुक सुरुळीत सुरु आहे. कोल्हापूर- जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये पूर परिस्थिती नाही मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासात ७ फुटांनी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी २१.६ फुट असून इशारा पातळी ३९ फुट एवढी आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने झालेली वाढ आणि पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता  एनडीआरएफच्या दोन तुकड्या तेनात करण्यात आल्या आहेत. ­

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in