
तेजस वाघमारे/मुंबई
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रभादेवी मंदिर सुमारे ३०० वर्षांहून अधिक प्राचीन आहे. या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘प्रभादेवी रेल्वे स्थानक’ करण्यात आले आहे. मात्र, मंदिराच्या जवळील प्रमुख रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्याची मागणी स्थानिकांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने रहिवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.
प्रभादेवी या देवीचे मूळ नाव ‘प्रभावती’ आहे. मात्र, काळाच्या ओघात तिचे नाव प्रभादेवी झाले. यादव वंशाचा कुलदीपक राजा बिंब याची ही कुलदेवता. प्रभादेवी मंदिरात दरवर्षी पौष पौर्णिमेला म्हणजे जानेवारी महिन्यात देवीचा उत्सव सुरू होतो. हा उत्सव दहा दिवस चालतो. ३०० वर्षापूर्वीचे हे पुरातन मंदिर आहे. मराठी लोकांची कुलस्वामिनी म्हणूनही प्रभादेवी ओळखली जाते. प्रभादेवीतील स्थानिकांनी देवीला ३०० वर्षे पूर्ण झाल्याने मोठा सोहळा केला होता. यासाठी प्रभादेवी जनसेवा समिती निर्माण करण्यात आली होती. या उत्सवावेळी ५ हजार सुवासिनीच्या ओटी भरण्यात आल्या होत्या. तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
प्रभादेवी आणि आजूबाजूच्या परिसरातील मराठी कुटुंबांचे स्थलांतर झाल्यानंतरही जत्रेचे स्वरूप आणि देवीच्या प्रती असलेला भक्तिभाव थोडाही कमी झालेला नाही. प्रभादेवीची जत्रा लहान मुलांसह ज्येष्ठांनाही आनंद देणारी असते. या जत्रेच्या निमित्ताने अनेक माहेरवासिनी देवीची ओटी भरण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात. प्रभादेवी ही मूळची शाकंबरी देवी. सध्या मंदिरात असलेली शाकंबरीची मूर्ती १२व्या शतकातील असल्याचे बोलले जाते.
मंदिराचा इतिहास
यादव वंशाचा कुलदीपक राजा बिंब याने आपली राजधानी माहीम येथे स्थापन केली होती. राजा बिंब याची प्रभादेवी ही कुलदेवता. परकीय आक्रमणे झाली तेव्हा राजा बिंब याने बांधलेले देऊळ नष्ट करण्यात आले. मात्र, मूर्ती वाचविण्यासाठी ही मूर्ती वांद्रे येथील एका विहिरीत लपवण्यात आली. यानंतर पाठारे प्रभू समाजाच्या श्याम नायक यांना देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की, मला विहिरीतून काढून माझी मंदिरात प्रतिष्ठापना कर. त्याप्रमाणे नायक यांनी इ.स. १७१४ मध्ये देवीची स्थापना करून १७१५ मध्ये मंदिरांचे बांधकाम पूर्ण केले. पाठारे-प्रभूंची देवी म्हणून तिचे नामकरण ‘प्रभावती’ असे करण्यात आले. त्या मंदिराचे मूळ मालक कृष्णनाथ जयानंद कीर्तीकर. त्यांनी पुढे १९५५ साली मंदिरासाठी खासगी विश्वस्त नेमले. आज प्रभादेवी व लक्ष्मीनारायण यांच्या मूर्तींबरोबरच शितलादेवी, मारुती, शंकर, पार्वती, गणपती, खोकला देवी यांच्या मूर्तीसुद्धा मंदिरात आहेत.
प्रभादेवीवासीयांचे अढळ श्रद्धास्थान असलेले मंदिर.
या देवीचे जुने मंदिर जुनी प्रभादेवी येथे आहे.
पौष पौर्णिमेला यात्रा उत्सव सुरू होतो.
हा उत्सव दहा दिवस चालतो.
या विभागाचे खासदार राहुल शेवाळे असताना त्यांच्याकडे स्थानिकांनी मुख्य मार्गाजवळ प्रभादेवी प्रवेशद्वार बांधून देण्याची मागणी केली होती. रहिवाशांची मागणी त्यांनी मान्य केली होती. मात्र, ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे याची खंत वाटते.
- किसन सारंग (भाविक)
मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भटजींकडून चांगली वागणूक मिळावी ही अपेक्षा आहे. दर्शनाची वेळ संपली की मंदिर बंद केले जाते. भाविक हिरमुसून जात असल्याने बाहेरून येणाऱ्यांना ओटी ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच मंदिर बंद झाल्यानंतर भाविकांना दर्शन घेण्यासाठी व्यवस्था केल्यास लांबून येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळेल.
- किशोर गावडे (भाविक)