अंधेरीत गॅस पाईपलाइनच्या गळतीमुळे तीन जण जखमी; रिक्षा व दुचाकी जळून खाक

अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनीत शनिवारी रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध असलेल्या महानगर गॅस पाईपलाइनच्या लिकेजमुळे आगीचा भडका उडाला.
अंधेरीत गॅस पाईपलाइनच्या गळतीमुळे तीन जण जखमी; रिक्षा व दुचाकी जळून खाक
एक्स @mashrujeet
Published on

मुंबई : अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनीत शनिवारी रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध असलेल्या महानगर गॅस पाईपलाइनच्या लिकेजमुळे आगीचा भडका उडाला. यावेळी तेथून जाणारा एक रिक्षाचालक व दोन दुचाकीस्वार असे तीन जण जखमी झाल्याचे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

या दुर्घटनेतील तीन जखमींना जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अंधेरी पूर्व येथील शेर-ए-पंजाब कॉलनीतील गुरुद्वारासमोर असलेल्या रस्त्यातून जाणारी महानगर गॅस कंपनीची पीएनजी पाईपलाइन शनिवारी रात्री सुमारे ११.३० च्या सुमारास लीक झाली. पाईपलाइन लिकेज झाल्यानंतर शॉर्टसर्किट होऊन तेथे आग लागली. यात रस्त्यावर असलेला रिक्षाचालक आणि दोन दुचाकीस्वार जखमी झाले. या दुर्घटनेत त्यांच्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात गळतीमुळे तीन जण जखमी

नुकसान झाले. दरम्यान, अग्निशमन दलाने सुमारे एक तास केलेल्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

जखमींवर ‘आयसीयू’त उपचार

जखमींना तातडीने जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रिक्षाचालक सुरेश गुप्ता (५२) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेत अरविंदकुमार कैथाल (२१) आणि अमन सरोज (२२) हे दुचाकीस्वार प्रत्येकी ५० टक्के भाजले आहेत. मात्र, या दोघांनी डॉक्टरांकडून स्वतःच्या जोखमीवर डिस्चार्ज घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर रुग्णालयाचे डॉ. ललित आणि सर्व टीमकडून जखमीवर उपचार सुरू आहेत.

...तर तातडीने तक्रार करा!

अंधेरीसारखी दुर्घटना इतर कुठेही पुन्हा होऊ नये, यासाठी पालिका अधिकाऱ्यांबरोबर आमची बोलणी सुरू आहेत. मुंबईत कुठेही अनधिकृतपणे खोदकाम करण्यात येत असेल, तर अशा वेळी जमिनीखालील महानगर गॅस पाईपलाइन फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रहिवाशांनी १८००२१००२१०० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगर गॅस कंपनीने केले आहे.

गोरेगाव फिल्म सिटी रोडवर आग

गोरेगाव फिल्म सिटी रोडवरील, रत्नागिरी हाॅटेल जवळील झोपडपट्टीत रविवारी सायंकाळी अग्निभडका उडाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून येथील झोपड्या दुकाने जळून खाक झाली. दरम्यान, आगीचे नेमके कारण काय, याबाबत अग्निशमन दल, पालिकेच्या विभागीय अधिकारी पुढील तपास करीत आहेत. आगीवर रात्री उशिराने अग्निशमन दलाने फायर इंजिन आणि वॉटर टँकर यांच्या सहाय्याने नियंत्रण मिळविले. 

अनधिकृत खोदकामामुळे आग

शेर-ए-पंजाब कॉलनीत लागलेली आग ही रस्त्याच्या मधोमध अनधिकृतपणे जेसीबीने खोदकाम केल्यामुळे लागलेली आहे. आधी केलेल्या खोदकामामुळे गॅस पाइपलाइन रात्री फुटली आणि आग लागली. त्यामुळे या भागातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान, पाईपलाइन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला, अशी माहिती महानगर गॅस कंपनीकडून देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in