परळ ब्रिजवर अपघातात तिघांचा मृत्यू

अपघातानंतर डंपर चालकाने ही माहिती पोलिसांना दिली
परळ ब्रिजवर अपघातात तिघांचा मृत्यू
Published on

मुंबई : परळ ब्रिजवर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका तरुणासह दोन तरुणींचा समावेश असून अपघाताच्या वेळेस या तिघांनीही हेल्मेट घातले नव्हते. तनिश पतंगे, रेणुका तामरकर आणि निकोल डायस अशी या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.

सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजता तनिश हा त्याच्या दोन मैत्रिणी रेणुका आणि निकोल यांच्यासोबत मोटारसायकलवरून जात होता. मोटारसायकल परळ ब्रिजजवळ येताच त्याचे नियंत्रण सुटून ती डिव्हायडरला जोरात धडकली. या धडकेनंतर त्याच्या मोटारसायकलने एका डंपरला धडक दिली. त्यात तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर डंपर चालकाने ही माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्याकडे सापडलेल्या आयकार्ड, आधारकार्ड आणि पॅनकार्डवरून त्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. तनिश हा ॲण्टॉप हिल येथे राहत असून सध्या चंदीगड येथील एका कॉलसेंटरमध्ये कामाला होता. रेणुका ही माहीम येथे राहत असून सोमवारी ती कामासाठी म्हणून घरातून बाहेर निघाली होती. तिच्या कार्यालयातील ओळखपत्रावरून तिची ओळख पटली, तसेच चिराबाजार येथे राहणारी निकोल ही बेरोजगार असून तिने रेणुकाच्या आजारी आईची भेट घेत असल्याचे तिच्या वडिलांना सांगितले होते. हे तिघेही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती. मात्र, ते तिघेही एकत्र कुठे, कधी आणि कशासाठी भेटले होते. परळ ब्रिजवरून ते कुठे जाणार होते, याबाबतचा खुलासा होऊ शकला नाही.

logo
marathi.freepressjournal.in