दोन अपघातात तिघांचा मृत्यू
मुंबई : काळाचौकी आणि विक्रोळीतील दोन अपघातात तिघांचा मृत्यू झाला. त्यात मनपाच्या एका वरिष्ठ अधिकार्याचा समावेश आहे. मृतांमध्ये सय्यद रिझवी झोहर रजा ऊर्फ सार्यक (१८), त्याचा मित्र कैश अहमद इस्तियाक अहमद शेख ऊर्फ वैस (१९) आणि मनपा अधिकारी महेशचंद्र पगारे (५७) यांचा समावेश आहे. याप्रकरणी काळाचौकी आणि विक्रोळी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन एका रिक्षाचालकाला अटक, तर दुसऱ्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
सय्यद मोहम्मद सादिक हे गोवंडी येथे राहत असून, शुक्रवारी रात्री त्यांचा मावस भाऊ सय्यद रिझवी हा त्याच मित्र कैश अहमदसोबत त्याच्या बाईकवरून गोवंडीहून मुंबई सेंट्रल येथे जात होते. ही बाईक लालबाग ब्रिजजवळ येताच एका भरवेगात जाणार्या अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. या अपघातात सय्यद आणि कैश हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही जखमींना तातडीने भायखळा येथील मसिना रुग्णालयात दाखल केले होते. तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या अपघातात महेशचंद्र पगारे यांचा मृत्यू झाला. महेशचंद्र हे ठाण्यातील बाळकुम, दोस्ती वेस्टमध्ये राहत होते. मुंबई मनपाच्या ई-वॉर्डमध्ये ते वरिष्ठ अनुज्ञापन निरीक्षक म्हणून कामाला होते. शनिवारी सायंकाळी सव्वासहा वाजता घरी येण्यासाठी रिक्षाने प्रवास करत होते. ही रिक्षा विक्रोळीतील पूर्व दुतग्रती महामार्गावरील जेव्हीएलआर ब्रिजवरुन जात असताना चालकाने हलगर्जीपणाने रिक्षा चालविल्याने रिक्षाचा अपघात झाला होता. त्यांना वीर सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.