
मुंबई : लंडनला जाणाऱ्या तीन प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी तीन भारतीय पासपोर्ट जप्त केले असून या पासपोर्टवर व्हिसा मिळवून ते तिघेही लंडनला जाण्याच्या तयारीत होते; मात्र त्यांचा हा प्रयत्न इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमभाई रामदास मांगेला, ओडेदरा देवशीभाई होथी, आणि आकाश भालचंद्र मांगेला अशी या तिघांची नावे असून ते तिघेही गुजरातच्या वलसाड व पोरबंदरचे रहिवाशी आहेत. त्यांना बोगस पासपोर्ट आणि व्हिसा मिळवनू देणाऱ्या व्यक्तींचा पोलिसाकडून शोध सुरू आहे. कविता मेटकरी या मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून आहे.
शुक्रवारी मध्यरात्री तीन प्रवाशी लंडनला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतहावर आले होते; मात्र त्यांनी सादर केलेले भारतीय पासपोर्ट बोगस असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या तिघांनाही इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ते तिघेही मूळचे गुजरातचे रहिवाशी होते; मात्र भारतीय पासपोर्टसाठी त्यांनी मुंबई कार्यालयात अर्ज केला होता. त्यांनी अर्जासोबत बोगस दस्तावेज सादर करून ते पासपोर्ट मिळविले होते. याच पासपोर्टवर ते पहिल्यांदा लंडनला जाणार होते.