अल्पवयीन मुलांच्या विक्रीप्रकरणी तीन महिलांना अटक

या टोळीने आतापर्यंत सोळा मुलांची विक्री केली असून या सर्व मुलांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

मुंबई : अल्पवयीन मुलांच्या खरेदी-विक्रीप्रकरणी तीन महिलांना गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सनोवर अदनान चिपळणूकर, तब्बसूम शैफुद्दीन शेख आणि साफिया युनूस अली अशी त्यांची नावे असून त्यांना रत्नागिरीसह ग्रँटरोड येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या तावडीतून पोलिसांनी एका २९ दिवसांच्या मुलाची सुटका केली असून त्याला अंधेरीतील आंबोली, सेंट कॅथरिन होममध्ये ठेवण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले.

गेल्याच आठवड्यात लहान मुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या एका टोळीचा वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला होता. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी चार महिलांसह चार पुरुष अशा आठ जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत या टोळीने आतापर्यंत १६हून अधिक अल्पवयीन मुलांची विक्री केली असून त्यापैकी तीन मुलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.

लहान मुलांची खरेदी-विक्री करणारी ही एक आंतरराष्ट्रीय टोळी असून या टोळीने मुंबईसह इतर शहरात तसेच राज्यात काही मुलांची दोन ते तीन लाखांमध्ये विक्री केली होती. त्यांच्याच चौकशीनंतर पोलीस पथकाने ग्रँटरोड येथे राहणाऱ्या साफिया अली आणि रत्नागिरीतील दापोली, हुर्णेच्या सनोबर चिपळूणकर आणि तब्बसूम सैन या तीन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात सनोबरने एका मुलाला अडीच लाखांमध्ये विकत घेतल्याचे उघडकीस आले होते. २९ दिवसांचे ते मूल पोलिसांनी ताब्यात घेऊन आंबोलीतील सेंट कॅथरीन होममध्ये सुरक्षित ठेवले आहे. तब्बसूम आणि साफिया हे मुलांची खरेदी-विक्री करणारे एजंट असून त्यांनी काही मुलांची साडेतीन ते पाच लाखांमध्ये विक्री केल्याची कबुली दिली आहे.

आतापर्यंत १६ मुलांची विक्री

या टोळीने आतापर्यंत सोळा मुलांची विक्री केली असून या सर्व मुलांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या ते सर्व मुले सुरक्षित ठिकाणी असून त्यांची लवकरच सुटका करण्यात येणार आहे. दरम्यान लहान मुलांची खरेदी-विक्री करणारी ही आंतरराष्ट्रीय टोळी असल्याने संपूर्ण रॅकेट उद्धवस्त करण्यावर तसेच फरार असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी भर दिल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांनी बोलताना सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in