दिल्लीत भीक मागण्यासाठी तीन वर्षांच्या मुलाचे मुंबईतून अपहरण

दिल्लीत भीक मागण्यासाठी तीन वर्षांच्या मुलाचे मुंबईतून अपहरण

पोलिसांनी ताब्यात घेऊन या मुलाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले

दिल्लीत भीक मागण्यासाठी बोरिवली रेल्वे स्थानकातील ब्रिजवर खेळत असलेल्या एका तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अंजू वाल्मिकी या महिलेस बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत तिच्या १७ आणि १० वर्षांच्या दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.

अपहरणाचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत या तिघांनाही दादर रेल्वे स्थानकातून पोलिसांनी ताब्यात घेऊन या मुलाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. तक्रारदार महिला ही बोरिवली रेल्वे स्थानकाजवळील फुटपाथवर राहते. तिचा तीन वर्षांचा मुलगा गुरुवार, ८ सप्टेंबरला बोरिवली रेल्वे स्थानकातील ब्रिजवर खेळत होता. यावेळी एका १० वर्षांच्या मुलीने त्याला उचलले, त्याला तिच्या १७ वर्षांच्या बहिणीकडे आणि नंतर तिने त्याला त्यांच्या आईकडे सोपविले. त्यानंतर ते तिघेही या मुलाला घेऊन निघून गेले. काही वेळानंतर त्याची आई तिथे आली. तिला तिचा तीन वर्षांचा मुलगा दिसला नाही. त्यामुळे तिने त्याचा सर्वत्र शोध घेतला; मात्र तो सापडला नाही.

दुसर्‍या दिवशी तिने बोरिवली रेल्वे स्थानकात तिचा तीन वर्षांचा मुलगा मिसिंग असल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांच्या पथकाने या मुलाचा शोध सुरू केला. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर या मुलाला घेऊन एक महिला तिच्या दोन मुलींसोबत जात असताना दिसून आली. त्यांचा शोध सुरू असताना त्या तिघेही दादर रेल्वे स्थानकात असल्याची माहिती प्राप्त होताच या पथकाने दादर रेल्वे स्थानकातून अंजू वाल्मिकी या महिलेस अटक केली. तिच्यासोबत असलेल्या तिच्या दोन मुलींसह अपहरण झालेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अपहरणामागचे अनोखे लॉजिक

तपासात अंजू ही मूळची दिल्लीची रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी ती दिल्लीतून मुंबईत आली होती. अपहरण केलेल्या मुलाला दिल्लीत नेऊन ती भीक मागण्यासाठी त्याचा वापर करणार होती. पोलिसांना तिथे पोहोचण्यास जराही उशीर झाला असता तर ती दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसली असती. या मुलाची सुटका केल्यानंतर त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. दिल्लीत जेवढे लहान मूल तेवढी जास्त भीक मिळते, त्यामुळे अंजू ही दिल्लीहून मुलांच्या अपहरणासाठी मुंबईत आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in