मैदानात राडारोडा फेकणे पडले भारी; आठ डंपर आणि एक पोकलँड संयंत्र जप्त; पाच जणांवर गुन्हा

वडाळा येथील मोकळ्या मैदानात अनधिकृतपणे राडारोडा (डेब्रिज) टाकणाऱ्या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करत याकामी वापरण्यात आलेले आठ डंपर आणि एक पोकलँड संयंत्र जप्त केले.
मैदानात राडारोडा फेकणे पडले भारी; आठ डंपर आणि एक पोकलँड संयंत्र जप्त; पाच जणांवर गुन्हा

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबई अभियानाला केराची टोपली दाखवणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. वडाळा येथील मोकळ्या मैदानात अनधिकृतपणे राडारोडा (डेब्रिज) टाकणाऱ्या पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करत याकामी वापरण्यात आलेले आठ डंपर आणि एक पोकलँड संयंत्र जप्त केले. संबंधित वाहनाची नोंदणी रद्द करण्यासाठी परिवहन आयुक्तांना लेखी कळवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत.

पालिकेच्या हद्दीमध्ये राडारोडा (डेब्रिज) टाकण्यासाठी नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र वडाळा येथील भक्ती पार्क मोनोरेल स्थानकाच्या बाजूला एमएमआरडीएच्या मोकळ्या मैदानात डंपरच्या सहाय्याने काही व्यक्ती अनधिकृतपणे राडारोडा टाकत होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन कार्यवाही केली.

कठोर कारवाईसाठी प्रणाली विकसित करणार

अनधिकृतपणे सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात कठोर कार्यवाही करण्यासाठी प्रणाली विकसित करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत. अनधिकृतपणे राडारोडा वाहून नेणाऱ्यांविरोधात कार्यवाही करण्यास कोणतीही कसर सोडू नये, तसेच संबंधित वाहनांची नोंदणी रद्द करण्यासाठी परिवहन आयुक्त यांना लेखी कळवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

‘कॉल ऑन डेब्रिज’ सुविधा

घरांची दुरुस्ती किंवा पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोडाची (डेब्रिज) व्यवस्था करण्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याकडून ‘कॉल ऑन डेब्रिज’ ही सुविधा तयार करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत सुमारे ३०० मेट्रिक टनांपर्यंतचा राडारोडा पालिकेच्या वाहनातून नेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते. ‘कॉल ऑन डेब्रिज’ सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी नियमानुसार राडारोडाची विल्हेवाट लावावी. त्यासाठी कोणत्याही अनधिकृत मार्गांचा अवलंब करू नये. आपल्याकडील राडारोडा घेऊन जाण्यासाठी तसेच ‘कॉल ऑन डेब्रिज’ सुविधेसंदर्भात सहाय्यक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in