Mumbai : टार्गेट टायगर श्रॉफ; कारवर गोळीबार, बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारल्याचा दावा

जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर रविवारी गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तब्बल सात राऊंड फायर केल्यानंतर ते फरार झाले आहेत. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.
Mumbai : टार्गेट टायगर श्रॉफ; कारवर गोळीबार, बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारल्याचा दावा
Mumbai : टार्गेट टायगर श्रॉफ; कारवर गोळीबार, बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारल्याचा दावा
Published on: 

मुंबई : जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर रविवारी गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तब्बल सात राऊंड फायर केल्यानंतर ते फरार झाले आहेत. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे.

या हल्ल्यानंतर गँगस्टर अनिल पंडित याच्या नावाने सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसारित झाली आहे. मात्र, या पोस्टची सत्यता आणि त्यातील दाव्यांची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. पोलिसांनी या गोळीबाराच्या तपासासाठी १२ पथके तयार केली आहेत.

पश्चिम विभाग-२ चे पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी सांगितले, ‘जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली आहे. टायगर श्रॉफ सुरक्षित आहेत. त्यांना कोणतीही गोळी लागलेली नाही. पुढील तपास सुरू आहे’. पोलिस या घटनेचा तपास करत असून, गोळीबारामागची परिस्थिती जाणून घेण्याचा आणि यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेत जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘अनमोल बिश्नोई’ नावाच्या फेसबुक खात्यावरून एक पोस्ट प्रसारित होत असल्याचे समोर आले आहे. या पोस्टमध्ये हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. टोळीच्या वतीने अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी ही जबाबदारी घेत असल्याचे पोस्टमध्ये नमूद केले.

या पोस्टमध्ये टायगर श्रॉफशी यापूर्वी संपर्क साधून त्याला इशारा दिला होता, मात्र त्याने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, टोळीच्या मागण्या मान्य न करणाऱ्या किंवा सलमान खानसोबत काम करणाऱ्या मुंबईतील चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनाही लक्ष्य करण्याची धमकी या पोस्टमधून देण्यात आली आहे.

सुमारे १५ दिवसांपूर्वी समोर आलेल्या कथित खंडणीप्रकरणातही अनिल पंडित याचे नाव चर्चेत आले होते. हरियाणातील पानिपत येथील एका खासगी रुग्णालयाच्या मालकाला एक कोटी रुपयांची खंडणी मागणारी व्हॉइस नोट मिळाली होती. संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख अनिल पंडित अशी करून देत लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा दावा केल्याचे सांगण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याचा तातडीने तपास करून गोळीबारासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) सूत्रांनी दिली.

जॅकी श्राॅफ यांच्याकडून हल्ल्याला दुजोरा

हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेता टायगर श्रॉफ हा जुहू-विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम परिसरातील जमनालाल बजाज मैदानावर फुटबॉल खेळायला गेला होता. खेळ संपवून परतत असताना गोळीबाराची ही घटना घडली, ज्यात त्याच्या चालकाच्या हाताला दुखापत झाली. टायगरवर हल्ला झाल्याचे त्याचे वडील जॅकी श्राॅफ यांनी मान्य केले, पण त्यात त्याला कोणतीही इजा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in