टायगर श्रॉफ हल्ला : तीन आरोपी अटकेत; हल्ल्यामागे खंडणीची शक्यता

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. हल्ल्यानंतर मुंबईतून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या तिन्ही संशयितांना अवघ्या १५ मिनिटांच्या ऑपरेशननंतर अटक करण्यात आली.
टायगर श्रॉफ हल्ला : तीन आरोपी अटकेत; हल्ल्यामागे खंडणीची शक्यता
टायगर श्रॉफ हल्ला : तीन आरोपी अटकेत; हल्ल्यामागे खंडणीची शक्यता
Published on: 

मुंबई/कोटा : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावर तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. हल्ल्यानंतर मुंबईतून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या तिन्ही संशयितांना अवघ्या १५ मिनिटांच्या ऑपरेशननंतर अटक करण्यात आली.

कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ही सकाळी १०.१७ वाजता कोटा स्थानकावर थांबली असता, सर्वसाधारण डब्यातून (जनरल कोच) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. बिहारच्या बेगुसराय येथील रितिक उर्फ रोशन आणि हरयाणाच्या सोनीपत येथील रेहान यांचा यामध्ये समावेश आहे.

एकही आरोपी अल्पवयीन नाही

रविवार संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी तपास सुरू असताना, आरोपींपैकी रेहान हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा हस्तक 'अनिल पंडित' याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितले की, आरोपींपैकी एकाचे वय १८ वर्षे असून उर्वरित दोघांचे वय २२ वर्षे आहे. प्राथमिक माहितीत अटक केलेले सर्वजण अल्पवयीन असल्याचे बोलले जात होते, मात्र, पोलिसांनी ही अफवा फेटाळून लावली. ते म्हणाले, टायगर श्रॉफच्या कारवर ५ ते ६ राऊंड गोळीबार करण्यात आला.

अंधेरीतून दुचाकी जप्त

अटक करण्यात आलेल्या तीन हल्लेखोरांपैकी दोघांनी टायगर श्रॉफच्या कारवर ५ ते ६ गोळ्या झाडल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात वापरलेली मोटरसायकल मुंबईतील अंधेरी परिसरातून जप्त करण्यात आली आहे. सध्या तिन्ही संशयितांकडून कोणतेही हत्यार जप्त करण्यात आलेले नाही. आम्ही त्यांना राजस्थानमधून मुंबईला घेऊन येत आहोत, असे डीसीपींनी नमूद केले. याआधी टायगर श्रॉफला कोणत्याही प्रकारची धमकी मिळाल्याची कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती, अभिनेत्यावर गोळीबार करण्यामागचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. संशयित हल्लेखोरांच्या कसून चौकशीनंतरच यामागील कारणांचा उलगडा होईल, असे डीसीपींनी शेवटी सांगितले.

अनिल पंडितची धमकी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये, पानिपतचा ३५ वर्षीय रहिवासी आणि सध्या अमेरिकेत असलेला गँगस्टर अनिल पंडित याने टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टायगरने अभिनेता सलमान खानसोबत काम न करण्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे या क्लिपमध्ये म्हटले आहे. तसेच, १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणावरून लॉरेन्स बिश्नोई गँग आणि समाजाची माफी मागण्याची मागणी यात करण्यात आली आहे. माफी न मागितल्यास सलमान खानच्या जवळच्या इतर चित्रपट कलाकारांनाही लक्ष्य केले जाईल, अशी धमकीही देण्यात आली आहे. अनिल पंडितचे दिल्ली, पुणे, हरियाणा, कॅनडा, थायलंड आणि दुबईमधील दरोडे, गोळीबार आणि खंडणी प्रकरणांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. तथापि, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पाळेमुळे खणून काढणार - मुख्यमंत्री

गोळीबार केल्यानंतर हे आरोपी सुरतच्या दिशेने पळाले आणि तेथून जयपूरकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. मुंबई पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून राजस्थान पोलिसांशी संपर्क साधला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोटा रेल्वे स्थानकावर त्यांना पकडले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगली येथे पत्रकारांना सांगितले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस या आरोपींना लवकरच मुंबईत आणणार आहेत. पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई केली आहे. या घटनेची पाळेमुळे खणून काढेपर्यंत मुंबई पोलीस शांत बसणार नाहीत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. या गोळीबारामागील नेमका हेतू काय होता आणि यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेतला जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

बिश्नोई गँगला सरकारचा आशीर्वाद : सपकाळ

टायगर श्रॉफवरील हल्ल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा पोरखेळ पुन्हा उघड झाला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. पण हा गँगस्टर गुजरातच्या तुरुंगात असून तेथून तो कारवाया करत असेल तर सरकारच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोकळ घोषणाबाजी करण्यापेक्षा बिश्नोईच्या मुसक्या आवळून त्याला मुंबईत आणावे. त्याची चौकशी करून खटला दाखल करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in