प्रजासत्ताक दिवस, मराठा आंदोलनामुळे मुंबईत कडेकोट बंदोबस्त

मराठा आंदोलनामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सज्ज आहेत.
प्रजासत्ताक दिवस, मराठा आंदोलनामुळे मुंबईत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांना रजा रद्द केल्या असून सर्वांना शुक्रवारी बंदोबस्तासाठी हजर राहण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी जारी केला आहे. शहरात जमावबंदीसह हत्यारबंदी कायदा लागू केला आहे.

मराठा आंदोलनामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस सज्ज आहेत. पोलिसांनी विशेष बंदोबस्तही ठेवला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी हे बंदोबस्ताची पाहणी करत आहेत.

पोलीस आयुक्तांनी बंदोबस्तासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. त्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना परिसरात जास्तीत जास्त नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुंडांसह कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या समाजकंटकांवर विविध कलमांतर्गत कारवाई केली. अनेकांना घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस आणि बॉम्बशोधक-नाशक पथकाचे कर्मचारी श्‍वान पथकासह तैनात असतील.

प्रत्येक घडामोडीवर पोलिसांची नजर असून त्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला देण्यात येत आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. संशयित वाहने, वस्तूसह व्यक्तींची तपासणी आणि चौकशी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे. मुंबईतील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी विशेष काळजी घेण्याची सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

मुंबईतून मोठ्या संख्येने मराठा समाजातील लोक नवी मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. दरम्यान, आझाद मैदानात सभेसाठी स्टेज बनविण्याचे काम सुरू असून स्वत: मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी आझाद मैदानात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आझाद मैदानाला शुक्रवारी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.

मनोजकुमार शर्मा यांना पदक

देशातील एक हजाराहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना विविध श्रेणीतील शौर्य आणि सेवा पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांचाही यादरम्यान गौरव होणार आहे. त्यांच्या आयुष्यावर "१२ वी फेल" हा हिंदी चित्रपट बनला आहे. २००५ च्या महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी मनोज कुमार शर्मा, बिहार केडरचे बॅचमेट जितेंद्र राणा यांना गुणवंत सेवा पदक देण्यात आले आहे. सध्या शर्मा हे सीआयएसएफमध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in