मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबई पोलिसांसह चार हजारांहून अधिक होमगार्ड, एसएसटी, एफएसटीसोबत २६ केंद्रीय-राज्य सुरक्षा दलाला बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे. लोकांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावावा, कायदा व सुव्यवस्थेला कुठेही बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी, शक्यतो पोलिसांना हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली मतदानासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडून स्वतंत्र १४४ पोलीस अधिकारी आणि एक हजाराहून पोलीस अंमलदारांना बंदोबस्त कर्तव्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार किंवा गोंधळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी. मुंबई पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन होईल असे कृत्य करू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी मतदारांना केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी मुंबई पोलीस सज्ज असून काही तक्रार असल्यास लोकांनी मुंबई पोलिसांच्या १००, १०३, ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
४ हजार आरेापींवर प्रतिबंधक कारवाई
मुंबई पोलिसांसह चार हजारांहून अधिक होमगार्ड, महत्त्वाच्या ठिकाणी एसएसटी, एफएसटीसोबत २६ केंद्रीय-राज्य सुरक्षा दल, त्यात सीएपीएफ आणि एसएपी आदींना निवडणूक बंदोबस्ताकामी नेमणूक करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत मुंबई पोलिसांनी १७५ कोटींची कॅश, मूल्यवान वस्तू, दारू, ड्रग्ज आदी मुद्देमाल जप्त केला आहे. विविध कायद्यांतर्गत आतापर्यंत ४ हजार ४९२ आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज
अतिरिक्त पोलीस आयुक्त ५
पोलीस उपायुक्त २०
सहाय्यक पोलीस आयुक्त ८३
पोलीस अधिकारी २ हजारांहून अधिक
पोलीस कर्मचारी २५ हजारांहून अधिक
दंगल नियंत्रण पथक ३