मुंबई : शनिवारी झालेल्या पाच दिवसांच्या गणपतीसह गौरी विसर्जनादरम्यान मुंबई पोलिसांकडून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे विसर्जनादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शनिवारी पाच दिवसांच्या गणपतीसह गौरीचे विसर्जन होणार असल्याने दिवसभर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाच दिवसांच्या ४०२ सार्वजनिक तर २६ हजार ८७० घरगुती गणपतीसह ५ हजार ६९४ गौरीचे विसर्जन होणार होते. यादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी २ हजार ९४ पोलीस अधिकारी आणि ११ हजार ८३ पोलीस कर्मचारी आदींना विविध ठिकाणी तैनात केले होते. तसेच एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी टिम, आरएएफ कंपनी, होमगार्ड यांचीही बंदोबस्ताकामी मदत घेण्यात आली होती.
या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटिव्ही निगराणीखाली ठेवण्यात आले असून, ध्वनीक्षेपक यंत्रणेसह तात्पुरते नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.