मुंबई : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा शोध घेण्यासाठी रुग्णांची जिनोम सिक्वेंसिंग केली जाते. त्याच धर्तीवर आता टीबीच्या रुग्णांची जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येणार आहे. यामुळे टीबी कुठल्या प्रकारचा हे कळल्यावर वेळीच निदान वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात टीबीसी डीएसटी प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे.
मुंबईत दर तासाला ७ नवीन टीबीचे रुग्ण आढळून येत असून दर ४ तासाला क्षयरोगामुळे एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. एवढेच नाही तर लोक टीबीचे उपचार घेऊन ते अर्धवट सोडतात. त्यामुळे रुग्ण टीबीच्या औषधांना प्रतिरोधक बनत आहेत. परिणामी, क्षयरोगाचा बिघडलेला प्रकार एमडीआर आणि एक्सडीआरच्या स्वरूपात उदयास येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत महापालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात क्षयरोगाची लागण झालेल्या व्यक्तींच्या रक्ताचे नमुने पूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग करण्याची योजना जाहीर केली आहे.
हा फायदा होईल!
संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे क्षयरोगाची तीव्रता सहज शोधता येते. टीबीचा प्रतिकार ओळखता येतो. उदाहरणार्थ, टीबीचे कोणते औषध रुग्णावर काम करेल? कोणत्या औषधाला रुग्णांने प्रतिकारशक्ती विकसित केली आहे? यामुळे, टीबीशी संबंधित मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे म्हणाले.
डेंग्यूचा स्ट्रेन ओळखण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग!
मुंबईत गेल्या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने महापालिकेचा आरोग्य विभागही चिंतेत पडला होता. हे लक्षात घेता, डासांमुळे होणाऱ्या रोगास जबाबदार असलेल्या विशिष्ट डेंग्यू विषाणूचा स्ट्रेन ओळखण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.