मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरात 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहे. पालिकेच्या वतीनेही संपूर्ण मुंबई महानगरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पालिकेच्या सर्व २२७ प्रभागांमध्ये शनिवारी तिरंगा रॅली पार पडली. यात पालिका शाळांमधील ६३ हजार विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला.
'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत दिनांक ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत मुंबईमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, मानवंदना सोहळा, तिरंगा मेळा आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे.
घरोघरी मोफत तिरंगा वाटप
पालिकेतर्फे सध्या ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेनिमित्त घरोघरी मोफत तिरंगा वाटप करत आहे. तसेच विभागांमध्ये तिरंगा यात्रा, तिरंगा दौड, सुशोभीकरण, रोषणाई करण्यात आली आहे. या कामासाठी मुंबई महानगरपालिकेने तब्बल साडेतीन कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे. महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांना प्रत्येकी १२ लाख रुपये, शिक्षण विभागाला ५२ लाख रुपये आणि तिरंगा खरेदीसाठी वेगळा निधी खर्च केला आहे.