टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत लवकरच नवीन कुलगुरू? प्र-उपकुलगुरू तत्काळ प्रभावाने पदावरून मुक्त
मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर प्र-उपकुलगुरूंची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टिस) पुढील काही महिन्यांत नवीन कुलगुरू नियुक्त करण्याचा विचार करत असल्याचे समजते.
टिसने प्रा. शंकर दास यांना शुक्रवारी रात्री तत्काळ पद सोडण्यास सांगितले. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेचे आरोप आहेत. टिसच्या आदेशात नमूद करण्यात आले की, सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर प्रा. शंकर दास यांना तत्काळ प्रभावाने प्र-उपकुलगुरू पदावरून मुक्त करण्यात येत आहे.
त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय केंद्रीय दक्षता आयोगाकडून (सीव्हीसी) आलेल्या तक्रारीनंतर घेण्यात आला.
संस्थेतील सूत्रांनुसार, आता टिस थेट कुलगुरू नियुक्त करणार आहे आणि यासाठीचा प्रक्रिया कालावधी १ ते २ महिने असेल. कुलगुरू नियुक्त झाल्यानंतर प्र-उपकुलगुरू पदाची गरज उरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
प्रा. दास यांच्यावर निधी गैरवापराची तक्रार आल्यानंतर संस्थेने एक तथ्य-शोध समिती गठित करून प्राथमिक चौकशी सुरू केली. या समितीने सखोल चौकशी आवश्यक असल्याचा अहवाल दिल्यानंतर दुसरी समिती स्थापन करण्यात आली असून ती तपास चालवत आहे.
प्रा. शंकर दास सध्या ‘स्कूल ऑफ हेल्थ सिस्टम्स स्टडीज’चे अधिष्ठाता आहेत आणि ते आपले शैक्षणिक पद कायम ठेवणार आहेत.
प्रा. दास यांनी २००८ साली टिसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना शासकीय, सार्वजनिक क्षेत्र, शैक्षणिक व आंतरराष्ट्रीय संस्थांमधील तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांची प्र-उपकुलगुरू म्हणून नियुक्ती ३० जानेवारी २०२४ रोजी झाली होती.