एका खांबावर उभारणार जलाशय हँगिंग गार्डनचे वैभव राखण्यासाठी तज्ज्ञांचे मत घेणार -दीपक केसरकर

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत
एका खांबावर उभारणार जलाशय हँगिंग गार्डनचे वैभव राखण्यासाठी तज्ज्ञांचे मत घेणार -दीपक केसरकर

मुंबई : मुंबईत एका स्तंभावर इमारती उभारल्या जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मलबार हिल येथील जलाशयाची पुनर्बांधणी करणे शक्य होईल. यासाठी तज्ज्ञांचे मत घेणार असून झाडे न कापता जलाशयाची पुनर्बांधणी करण्याची चाचपणी करण्यात येत असून हँगिंग गार्डनला हानी न पोहोचवता जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येईल, असा विश्वास मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.

मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या जलाशयाची क्षमता वाढवताना तेथील झाडे बाधित होणार नाहीत, याकडे लक्ष दिले जाणार आहे. जलाशयाचे काम करताना येथील ऐतिहासिक हँगिंग गार्डनला धक्का न लावता, या गार्डनचा लूक बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हँगिंग गार्डनचा विकास करताना तेथील जुन्या ऐतिहासिक वस्तूंची जपणूक केली जाईल. येथे जुने पोस्ट ऑफिस तसेच इतरही काही ऐतिासिक गोष्टी आहेत, त्यांचाही कायापालट केला जाईल. या गार्डनच्या सौंदर्यात आणखी भर कशी पडेल, यावर लक्ष दिले जाणार आहे. पोस्ट ऑफिस येथील जलाशयाची क्षमता वाढवा, अशाप्रकारच्या सूचना स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. त्याचा विचार करण्यात येत असल्याचे दीपक केसरकर म्हणाले.

जलाशयाच्या पुनर्बांधणीमुळे सध्याच्या जलाशयाची दररोज सुमारे १५० दशलक्ष लिटरची क्षमता १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याची योजना आहे. नवीन जलाशय कुलाबा, फोर्ट, कफ परेड, नरिमन पॉईंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, गिरगाव, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड आणि ग्रॅट रोडमधील पालिकेच्या प्रभागांना पाणीपुरवठा करणार आहे. सुमारे ६९५ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या जलाशयाच्या बांधकामादरम्यान १८९ झाडे कापली जाणार असून २०० झाडांचे फिरोजशाह मेहता उद्यानात (हँगिंग गार्डन) पुनर्रोपण पालिकेने प्रस्तावित केले आहे. मात्र झाडे काढण्यासाठी येथील रहिवाशांनी विरोध केला आहे. त्यामुळे इतर काही पर्याय शोधले जात आहेत. जलाशय पुनर्बांधणीसह येथील हँगिंग गार्डनचाही विकास केला जाणार आहे. मलबार हिल येथील परिसर ऐतिहासिक असल्याने विकास करताना येथील जुनी कोणतीही वस्तू, झाडे आदी बाधित होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार आहे. जलाशयाची क्षमता वाढवतानाच तेथील हँगिंग गार्डनचाही लूक येत्या काळात बदलणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

प्रदूषण रोखण्यासाठी फॉगिंग मशीन!

मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ठाण्यातील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठिकठिकाणी फॉगिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर मुंबईतही फॉगिंग मशीन बसवण्यात येतील.

गेटवे ऑफ इंडिया येथे आधुनिक बोटी!

गेटवे ऑफ इंडिया येथील बोटी जुन्या झाल्या असून त्या नवीन आधुनिक बोटी उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासाठी मेरीटाईम बोर्डाबरोबर चर्चा सुरू आहे.

कोळीवाड्यांना गतवैभव मिळणार

मुंबईत ४१ कोळीवाडे असून त्यांची वेगळी ओळख आहे. त्यामुळे ब्रिटिशकालीन कोळीवाड्यांचा विकास करण्यात येणार असला तरी पुरातन वास्तू म्हणून जतन करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोळीवाड्यांचा पुनर्विकास करताना गतवैभव जपण्यात येणार आहे. यासाठी पुढील आठवड्यापासून वरळी, माहिम व उपनगरातील कोळीवाड्यांना भेटी देणार असल्याचे ते म्हणाले.

मालवाहतुकीसाठी बॅटरीची कार

क्राफट मार्केट परिसरात आजही मालवाहतूक हातगाड्यांवरून केली जाते. यामुळे हातगाडी हाकणाऱ्यांना त्रास होतो आणि वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्यांना हातगाडी ऐवजी बॅटरीवर चालणारी गाडी देण्याबाबत विचार सुरू आहे. जेणेकरून कामगारालाही त्रास होणार नाही आणि वाहतूककोंडी होणार नाही, असेही केसरकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in