मुंबईत १७ मार्चला काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा, भारत जोडो यात्रेच्या सांगतेसह निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप येत्या १७ मार्चला मुंबईत होत आहे.
मुंबईत १७ मार्चला काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन; शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा, भारत जोडो यात्रेच्या सांगतेसह निवडणुकीचे रणशिंग फुंकणार
(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप येत्या १७ मार्चला मुंबईत होत आहे. यानिमित्ताने काँग्रेसकडून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवाजी पार्कच्या मैदानावर राहुल गांधी यांची भव्य सभा त्यासाठी आयोजित करण्यात आली असून सभेच्या माध्यमातून काँग्रेस निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये येणार आहे. धुळे, नाशिक, भिवंडी, ठाणे मार्गे राहुल गांधी मुंबईत १६ मार्चला संध्याकाळी पोहचतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ मार्चला शिवाजी पार्कवर भव्य सभा होणार आहे.

या यात्रेच्या तयारीची चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे काँग्रेसच्या नेत्यांची बैठक गुरुवारी पार पडली. त्यानंतर याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्चला नंदुरबार येथून महाराष्ट्रात प्रवेश करेल आणि १७ मार्चला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार असून या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित असतील. या सभेत लोकसभा निवडणुकीचा शंखनाद फुंकला जाईल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

नंदुरबार ते मुंबई या प्रवासात अनेक कार्यक्रम होतील. त्यासाठी त्या-त्या भागातील नेत्यांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ही सभा १७ मार्च २०२४ रोजी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in