ओल्या कचऱ्याची विकेंद्रित स्वरूपात विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई शहरात नऊ ठिकाणी दोन मेट्रिक टन क्षमतेची बायोमिथेशन सयंत्रे उभारण्यासाठी निविदा प्रकिया सुरू आहे. डम्पिग ग्राउंडवरील क्षमता कमी करण्यासाठी विकेंद्रित स्वरूपात विविध प्रक्रियेद्वारे ओल्या कचऱ्यावर प्रकिया करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत निर्माण होणाऱ्या सुमारे ७० टन प्रतिदिन इतक्या घरगुती घातक कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने तीन प्रकल्प कार्यान्वित केले असून, आठ नवीन प्रकल्पांसाठी निविदा मागविण्यात आल्याचे पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी सांगितले. सोमवारी पालिका मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०२१पर्यंत १२,८१९ आसनांची ५६२ स्वच्छतागृहे बांधून पूर्ण झाली आहेत. ६,६३५ आसनांच्या २६६ स्वच्छतागृहांचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच २०२२ वर्षासाठी १९,४५४ आसने असलेली ८२८ सामुदायिक स्वच्छतागृहे बांधण्याचे लक्ष्य आहे. घन कचरा व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसाठी ४६ वसाहतींमध्ये केवळ ५,५९२ सेवा निवासस्थाने उपलब्ध आहेत. घन कचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना चांगल्या निवासी सुविधा देण्याकरिता उपलब्ध ३० वसाहतींचा पुनर्विकास करून १३ हजार निवासस्थाने निर्माण करण्याचे प्रस्ताविले आहे.
देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचे नियोजिले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ६०० टन प्रति दिन क्षमतेच्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून ऊर्जानिर्मिती करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नेमणूक केलेली आहे. प्रकल्पाचे आखणी व बांधकामाचे काम सुरू झाले आहे. सदर प्रकल्पामधून सुमारे ६०० टन प्रति दिन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून सुमार चार मेगावॉट प्रतिदिन ऊर्जानिर्मिती होईल. मुलुंड क्षेपणभूमी येथे अस्तित्वात असलेल्या कचऱ्यावर योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन पुन:प्राप्त करण्यासाठीच्या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. सदर प्रकल्पामध्ये सुमारे सात दशलक्ष टन जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे, असेही चहल म्हणाले.