निवासी डॉक्टर मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे

निवासी डॉक्टर मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे

निवासी डॉक्टरच्या संघटनेने उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली

मुंबई: निवासी डॉक्टरांच्या राहण्यासाठी असणाऱ्या वस्तीगृहांची दुरावस्था, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहाय्यक व सहयोगी प्राध्यापकांच्या खाली जागा, निवासी डॉक्टरांवर सतत होणारे हल्ले, एनएमसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात ३ महिनेसाठी पोस्टिंग यामुळे सध्या निवासी डॉक्टर तणावाखाली आहेत. त्यामुळे या प्रश्नात तोडगा काढण्यासाठी या निवासी डॉक्टरच्या संघटनेने उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली. त्यासाठीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

निवासी डॉक्टरांची विविध मागण्यांसाठी प्रलंबित मागण्या संदर्भात राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता; परंतु तुमचा बहुतांश मागणे अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे मार्ड संघटनेच्या निवासी डॉक्टरांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. यात निवासी डॉक्टरांच्या राहण्यासाठी असणाऱ्या वस्तीगृहांची दुरावस्था कायम आहे. जेजे हॉस्पिटल वगळता इतर कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात वसतिगृहासाठी अद्यापपर्यंत निधी वितरीत झाला नाही किंवा प्रत्यक्ष कार्य सुरू झाले नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांना भयंकर परिस्थितीत वस्तीगृहांमध्ये राहावे लागत आहे. तसेच नवीन वस्तीग्रहांसाठी मंजुरी मिळालेली नाही.

'या' आहेत मागण्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सहाय्यक व सहयोगी प्राध्यापकांच्या भरपूर जागा खाली असल्यामुळे निवासी डॉक्टरांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. निवासी डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे डॉक्टर खूप जास्त त्रस्त असून, सुरक्षेचा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे. एनएमसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यात पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात ३ महिन्यांसाठी पोस्टिंग देण्यात आली आहे. या पोस्टिंगमध्ये नाना प्रकारच्या अडचणी येत आहेत. कुठे राहण्याचा प्रश्न तर कुठे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच निवासी डॉक्टरांचे थकबाकी असलेले फरकाचे वेतन अद्यापपर्यंत बऱ्याचशा महाविद्यालयांमध्ये मिळालेले नाही. या अडचणीत तातडीने सोडविणे गरजेचे आहे हे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याचे सेंट्रल मार्ड अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in