रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहे चकाचक, सफाईसाठी कंत्राटदाराची नियुक्ती- डॉ. सुधाकर शिंदे

मुंबई महापालिकेवर रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांच्या साफसफाईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहे चकाचक, सफाईसाठी कंत्राटदाराची नियुक्ती- डॉ. सुधाकर शिंदे

मुंबई : मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई विभागातील स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासना बरोबर चर्चा सुरू असून, रेल्वे प्रशासनाने सूचवलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

मुंबई प्रदूषण मुक्तीसाठी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील प्रमुख रस्ते, पदपथ, चौक याठिकाणी नियमित स्वच्छता करण्याचे आदेश शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीतील स्थानकातील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेने करावी, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले. त्या अनुषंगाने रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

मुंबई उपनगरीय रेल्वे लोकलने दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येतात. तसेच प्रवाशांमध्ये जेष्ठ नागरिक, महिला, गरोदर माता, अपंग या प्रवाशांची संख्या मोठी आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे स्थानकात स्वच्छतागृह उपलब्ध असून, सुमारे १०८ स्थानकातील स्वच्छतागृहांचा वापर लाखो प्रवासी करतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता स्वच्छतागृहांची साफसफाई करणे गरजेचे असून, स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत यासाठी रोज साफसफाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांच्या साफसफाईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in