टोमॅटो फाइल्स : कुठे हाणामारी, तर कुठे वाढदिवसाची भेट

टोमॅटोच्या रसाळ गाथेने कभी खुशी कभी गमसारख्या भावना
टोमॅटो फाइल्स : कुठे हाणामारी, तर कुठे वाढदिवसाची भेट

मुंबई : मान्सूनच्या आगमनाला विलंब झाल्याने देशभरात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. रोजच्या वापरातील अनेक भाज्याही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दरांनी देशभरात चित्रविचित्र घटनांना जन्म दिला आहे. कुठे ग्राहक आणि व्यापारी टोमॅटोसारखे लालबुंद होत हमरातुमरीवर येत आहेत. तर कुठे भाऊ बहिणीला वाढदिवशी टोमॅटोची भेट देऊन तिच्या गालावर टोमॅटोची लाली उमटवत आहे. टोमॅटोच्या या रसाळ गाथेने कभी खुशी कभी गमसारख्या भावना उमटत आहेत.

देशभरात टोमॅटोच्या गाथेला रंग भरत असताना कल्याणमधील एका भावाने आपल्या बहिणीला वाढदिवसाची भेट म्हणून चक्क दोन किलो टोमॅटो देण्याची कल्पकता दाखवली. कल्याणचे रहिवासी गौतम वाघ यांच्या बहिणीचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. आपल्या लाडक्या बहिणीला अशा शुभदिनी आवडीच्या भेटवस्तू देऊन खूश करण्यास भाऊ कायमच तत्पर असतात. काही वेळा थोडी आगळी भेट देऊन वातावरणात आश्चर्यमिश्रित आनंद निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जातो. गौतम वाघ यांनी यावेळी नेमके हेच केले. त्यांनी बहिणीला वाढदिवसाची भेट म्हणून दोन दिलो टोमॅटो दिले. त्याने बहिणीच्या चेहऱ्यावर टोमॅटोसारखी लाली उमटली नसेल तरच नवल.

यंदा देशभरात मान्सूनच्या आगमनाला अंमळ उशीरच झाला. खरीप हंगामाच्या पेरण्या लांबल्या. पुरेशा पाण्याच्या अभावी भाजीपालाही वेळेवर पिकवता आला नाही. त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला. भाजीपाल्याची आवक घटली आणि मागणी कायम असल्याने भाज्यांचे दर नेहमीपेक्षा कैक पटीने वाढले. कांदा, टोमॅटो या सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील भाज्या, पण विविध ठिकाणी टोमॅटोचे दर एका किलोला १५० ते २०० रुपयांपर्यंत वाढले. त्यामुळे रोजच्या वापरातील हे जिन्नस सर्वसामान्यांच्या आहारातून जवळपास हद्दपारच झाले. सध्याच्या महागाईत टोमॅटो खाणे हे प्रतिष्ठेचे लक्षण झाल्यासारखीच परिस्थिती आहे. इतकेच नव्हे, तर मॅक‌्डोनल्डसारख्या उच्चभ्रू उपाहारगृहांनीही त्यांच्या अनेक खाद्यपदार्थांतून टोमॅटोला रजा दिली.

पुण्यातील वडगावशेरी भाजी बाजारात नुकतीच घडलेली घटना टोमॅटोने निर्माण केलेल्या तणावाची कल्पना देऊन जाते. येथे एका व्यापाऱ्याने एका ग्राहकाला पाव किलो टोमॅटोचा दर २० रुपये असा सांगितला. ग्राहकाला तो जरा जास्तच वाटला. त्याबाबत ग्राहकाने नाराजी व्यक्त करताच व्यापारी रागावून टोमॅटोसारखा लालबुंद झाला. त्याने शिवीगाळ करत सरळ वजनकाट्यातील लोखंडी वजनच ग्राहकाला फेकून मारले. या प्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या टोमॅटो ही एवढी मूल्यवान भाजी बनली आहे की, वाराणसीतील अजय फौजी नावाच्या भाजी विक्रेत्याने त्यावरून होणारी हमरीतुमरी टाळण्यासाठी चक्क मॉल्स किंवा बारच्या दारात तैनात असतात तसे हट्टेकट्टे बाऊन्सर्स ठेवले आहेत. वाराणसीत टोमॅटोचे दर प्रतिकिलो १६० ते १८० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना टोमॅटो परवडत नसून ते केवळ १०० ते २०० ग्रॅम टोमॅटो विकत घेऊन वेळ निभावत आहेत. अनेकवेळा टोमॅटो खरेदी करताना दराबाबत घासाघीस केली जाते आणि काही ग्राहक रागाच्या भरात अपशब्द वापरतात. क्वचितप्रसंगी प्रकरण हमरातुमरीवर जाते. अशा वेळी आत्मसंरक्षणासाठी सोबतीला पहिलवान असलेले बरे, असा विचार करून अजय फौजी यांनी बाऊन्सर्स बाळगले आहेत.

बहुतांश भाजीपाला नाशवंत असतो. त्यामुळे शेतातून काढल्यानंतर वेळेवर बाजारपेठेत पोहचणे गरजेचे असते. ही निकड लक्षात घेऊन केंद्र सरकारने २०१८-१९ साली ऑपरेशन ग्रीन्स नावाने मोहीम राबवण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी त्या वर्षी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ऑपरेशन ग्रीन्स अंतर्गत टॉप नावाची योजना राबवली जाते. टोमॅटो, ओनियन आणि पोटॅटो या भाज्यांची अद्याक्षरे घेऊन टॉप हे लघुरूप तयार केले आहे. या भाज्यांची शेतातून बाजारपेठेपर्यंत वेगवान वाहतूक, साठवणूक आणि प्रक्रिया याला या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत साशंकता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in